MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाचा शुभारंभ 4 जून रोजी होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडेल. महाराष्ट्रातील तमाम क्रिकेटपटू व क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार आहे. आज आपण स्पर्धेच्या मागील म्हणजेच दुसऱ्या हंगामात शतक झकावणाऱ्या फलंदाजांविषयी माहिती घेऊया.
(Centurions From MPL 2024)
एमपीएल 2023 प्रमाणेच एमपीएल 2024 मध्ये देखील केवळ दोनच फलंदाज शतक पूर्ण करू शकले. पहिल्या हंगामात अंकित बावणे व युवा अर्शिन कुलकर्णी यांनी हा मान मिळवलेला. दुसऱ्या वर्षी छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स यांच्या दरम्यान झालेल्या स्पर्धेतील 23 व्या सामन्यातच दोन्ही शतके आली.
मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर मंदार भंडारी (Mandar Bhandari) याने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारत सीएसकेच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. आक्रमण व संयम यांचा दुहेरी संगम साधताना त्याने 58 चेंडूंमध्ये नाबाद 102 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीमध्ये सहा चौकार व सात षटकार लगावले होते. त्याच्या या खेळीमुळे नाशिक संघाने 212 धावा केल्या. ईगल नाशिक टायटन्स संघासाठी एमपीएल इतिहासात शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरलेला. (MPL 2024 Centurions: Mandar Bhandari and Murtuza Trunkwala Shine with Stunning Hundreds)
मंदारच्या शतकाची चर्चा सुरू असतानाच त्याच सामन्यात हंगामातील दुसरे व अखेरचे शतक आले. छत्रपती संभाजी किंग्स संघाचा कर्णधार मूर्तझा ट्रंकवाला (Murtaza Trunkwala) याने मंदारची ती खेळी झाकोळून टाकली. त्यानेदेखील सलामीला उतरताना कर्णधार म्हणून आपली जबाबदारी सक्षमरित्या पार पाडली.
ओम भोसले याच्यासोबत पहिल्याच गड्यासाठी 144 धावांची भागीदारी त्याने केली. सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने 122 धावा केल्या. यामध्ये तब्बल 11 चौकार व सात टोलेजंग षटकार सामील होते. ही एमपीएलमधील आतापर्यंत ती सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या सामन्यात मूर्तझा याने ही ऐतिहासिक खेळी केली तरी, स्पर्धेच्या इतर सामन्यांमध्ये तो फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. त्याला दहा डावांमध्ये मिळून केवळ 242 धावा करता आल्या. (Murtuza Trunkwala and Mandar Bhandari Scored Centuries in MPL 2024)
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या स्पर्धेचा हा तिसरा हंगाम असणार आहे. पुण्याजवळील गहुंजेस्थित महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम 4 जून ते 24 जून या काळात सहा संघांदरम्यान खेळवण्यात येईल. एमपीएलसोबतच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा देखील पहिला हंगाम यावेळी खेळला जाणार आहे. या दोन्ही दर्जेदार स्पर्धांचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar या ओटीपी प्लॅटफॉर्मवर होईल. तर, Star Sports 2 या टीव्ही चॅनेलवर सामने पाहता येणार आहेत. सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. (MPL 2025 Live Telecast on JioHotstar OTT and Star Sports 2 TV Channel)






