श्रीलंका क्रिकेट सध्या अत्यंत कठीण काळातून जात आहे. मैदानावर संघाची कामगिरी घसरत असतानाच मैदानाबाहेरील घटनांमुळे क्रिकेट मंडळाला त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाण्याच्या काही तासांपूर्वीच, तीन दिवस आधी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या चमिंडा वासने राजीनामा देत खळबळ उडवून दिली आहे.
वासने दिला राजीनामा
श्रीलंकेचा सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज असलेला चमिंडा वास १९ फेब्रुवारी रोजी श्रीलंका संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून रुजू झाला होता. मात्र, अवघ्या तीन दिवसातच त्याने या पदाचा राजीनामा दिला. वासच्या राजीनाम्याचे कारण आर्थिक व्यवहार असल्याची माहिती पुढे आली आहे.
क्रिकेट मंडळाने दिले स्पष्टीकरण
वासच्या राजीनाम्यानंतर श्रीलंका क्रिकेट मंडळाने अधिकृतरीत्या पत्रक काढून म्हटले आहे की, ‘माजी खेळाडू व तीन दिवसांपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेल्या चमिंडा वासने राजीनामा दिला आहे. तसेच, आपण वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार नाही, हे देखील स्पष्ट केले. मंडळाच्या खराब आर्थिक परिस्थितीवेळीही त्याने भत्ता वाढविण्याची मागणी केली. त्यानंतरही त्याने हा बेजबाबदार निर्णय घेतला.’
श्रीलंका मंडळाच्या पत्रकात पुढे लिहिले आहे की, ‘श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि संपूर्ण देश चामिंडा वास याला आदर्श मानतो. त्याचे देशासाठी मोठे योगदान आहे. मात्र अशा कठीण स्थितीत त्यांनी हा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे. त्याने, मंडळाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. तो मंडळाशी करारबद्ध असलेला कर्मचारी आहे. त्याने वेतनवाढीची मागणी केली आणि आम्ही त्याला नम्रपणे नकार दिला. आम्ही त्याला आधीपासूनच योग्यतेनुसार वेतन त्याला देत आहोत.’
काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेच्या तब्बल १५ खेळाडूंनी देश सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये, अनुभवी सलामीवीर उपुल थरंगा, वेगवान गोलंदाज दुश्मंता चमिरा, अष्टपैलू मिलिंदा पुष्पकुमारा या राष्ट्रीय खेळाडूंचा देखील समावेश आहे. त्यानंतर, हा श्रीलंका क्रिकेट बोर्डाला बसलेला दुसरा मोठा धक्का मानला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रॉड की अँडरसन ? कोण खेळणार तिसऱ्या कसोटीत, स्वतः ब्रॉडने दिले उत्तर
INDvENG: दिवस-रात्र कसोटीसाठी असा असू शकतो ११ जणांचा भारतीय संघ; ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी
अफाट प्रतिभेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्याय न देऊ शकलेले नरेंद्र हिरवानी