काल(23 ऑक्टोबर) भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अधिकृतरित्या नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीनंतर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या गांगुलीला अनेक प्रश्न विचारण्यात आले.
यादरम्यान त्याला भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या भविष्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना गांगुलीने म्हटले आहे की ‘ते सर्व धोनीवर अवलंबून आहे. अगदी जेव्हा मी संघाबाहेर गेलो आणि ज्यावेळी सर्व जग म्हणत होते मी परत येऊ शकणार नाही, त्यावेळी मी माझ्यावर विश्वास ठेवला आणि पुनरागमन करत पुढे चार वर्षे खेळलो.’
‘तूम्हाला माहित आहे चॅम्पियन्स इतक्या लवकर संपत नाही. मला माहित नाही त्याच्या मनात काय आहे आणि तो त्याच्या कारकिर्दीबद्दल काय विचार करतो. तो दिग्गज आहे आणि एमएस धोनीचे भारतीय संघात असणे अभिमानास्पद आहे.’
‘जर तूम्ही विचार केला आणि धोनीने इतक्यावर्षात जे केले आहे ते पाहिले तर तूम्ही म्हणाल ‘वाह, एमएस धोनी’. मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत सर्वांचा सन्मान राखला जाईल. यामध्ये बदल होणार नाही.’
"India is proud to have @msdhoni" – @SGanguly99 #Respect ???????? pic.twitter.com/OtqN0a5XKB
— BCCI (@BCCI) October 23, 2019
धोनीने मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. तो भारताकडून शेवटचे 2019 विश्वचषकात जूलैमध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात खेळला होता. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरु आहे.






