भारतीय ‘अ’ (India-A) संघ 9 जूनपासून श्रीलंकेत होणाऱ्या वनडे ट्राय-सीरीजमध्ये भाग घेणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) काही काळापूर्वीच संघाची घोषणा केली होती. या मालिकेसाठी तिलक वर्माकडे (Tilak verma) कर्णधारपद, तर रियान परागकडे (Riyan Parag) उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, आता बीसीसीआयने संघात मोठा बदल केला आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रियान पराग या मालिकेतून बाहेर झाला असून, त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ऋतुराज गायकवाडला संघाचा उपकर्णधारही बनवण्यात आले आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, रियान पराग दुखापतीतून पूर्णपणे सावेपर्यंत बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये पुनर्वसनासाठी (rehabilitation) असेल. महत्वाचं म्हणजे, आयपीएल 2026 च्या हंगामात रियान पराग राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत होता. त्याच्या नेतृत्वाखालील संघाचा प्रवास क्वालिफायर-2 मध्ये पराभवासह संपला. या संपूर्ण हंगामात रियान पराग हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त होता, ज्याकारणाने तो काही सामन्यांना मुकला होता आणि त्याच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वालने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.
वनडे ट्राय-सीरीजसाठी इंडिया-ए चा सुधारित संघ:
तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), प्रियांश आर्या, वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), विपराज निगम, यश ठाकूर, युद्धवीर सिंग, अंशुल कंबोज, अरशद खान, अनुकूल रॉय.
या ट्राय-सीरीजमध्ये भारत आणि श्रीलंका ‘अ’ संघाव्यतिरिक्त अफगाणिस्तानचा संघ सहभागी होणार आहे. 9 जूनपासून सामन्यांची सुरुवात होणार असून, 21 जून रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. प्रत्येक संघाला एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळण्याची संधी मिळेल. हे सर्व सामने श्रीलंकेतील दांबुला स्टेडियमवर होतील आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होतील. या संपूर्ण स्पर्धेत सर्वांचे लक्ष 15 वर्षांचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याच्यावर असेल, ज्याने आयपीएल 2026 मध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत.






