आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषक (Odi WC 2027 Schedule Announced) 2027च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या 2027 वनडे विश्वचषकाची सुरुवात 2 ऑक्टोबरपासून होणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना 21 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.
या स्पर्धेत एकूण 14 संघ सहभागी होणार असून, 12 वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 57 सामने खेळवले जातील. स्पर्धेतील पहिला सामना कोणत्या संघांमध्ये होणार, याची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.
वनडे विश्वचषक 2027 स्पर्धेची सुरुवात 14 संघांमधील सर्वात खालच्या क्रमवारीतील तीन संघांमध्ये होणाऱ्या सुपर सीरीजने होईल. या टप्प्यात तिन्ही संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. म्हणजेच एकूण तीन सामने होतील.
या तीन संघांपैकी सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ 12 संघांच्या मुख्य गटात प्रवेश करेल, तर उर्वरित दोन संघांचा विश्वचषकातील प्रवास त्याच टप्प्यावर संपेल. यानंतर 12 संघांची प्रत्येकी 6 संघ अशा दोन गटांमध्ये विभागणी केली जाईल. गटातील सामन्यांनंतर स्पर्धा सुपर-7 टप्प्यात पोहोचेल. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना खेळवला जाईल.
सुपर सीरीजमध्ये सहभागी होणाऱ्या तीन संघांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. या संघांचा निर्णय पात्रता फेरीच्या स्पर्धेतून होईल. या पात्रता स्पर्धेत दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडिज आणि नामिबियासह एकूण 10 संघ सहभागी होतील. विश्वचषकातील 14 संघांपैकी 10 संघ 30 सप्टेंबरच्या पात्रता अंतिम मुदतीपर्यंत आपले स्थान निश्चित करतील.
यजमान असल्यामुळे दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि झिम्बाब्वेला (Zimbabve) विश्वचषकात थेट प्रवेश मिळाला आहे. उर्वरित आठ संघांची निवड वनडे क्रमवारीच्या आधारे होईल. भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांनी यापूर्वीच विश्वचषकातील आपले स्थान निश्चित केले आहे.
वनडे विश्वचषक 2027 साठी भारत आणि पाकिस्तानला (India & Pakistan) एकाच गटात ठेवण्यात आले आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि पात्रता फेरीतील संघ A असणार आहे. तसेच, गट बी मध्ये बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड संघ आहेत.
2027 वनडे विश्वचषकाच्या फॉरमॅटनुसार भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात स्पर्धेत दोन वेळा सामना होण्याची शक्यता आहे. पहिला सामना सुरुवातीच्या राउंड रॉबिन टप्प्यात होऊ शकतो, तर त्यानंतर दोन्ही संघ सुपर-7 टप्प्यात पोहोचल्यास पुन्हा त्यांच्यात सामना होऊ शकतो. जर दोन्ही संघ पुढील टप्प्यात पोहोचले, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसऱ्यांदा देखील सामना होण्याची शक्यता आहे.






