टी२० विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या पापुआ न्यू गिनीच्या संघाने आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना जिंकला नसला, तरी त्यांनी आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली आहेत. या संघाच्या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. पापुआ न्यू गिनी आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात असेच एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. जेव्हा पीएनजीचा क्षेत्ररक्षक चार्ल्स अमिनीने बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शकिब अल हसनला बाद करण्यासाठी अविश्वसनीय असा झेल घेतला.
पापुआ न्यू गिनीविरुद्ध शाकिब चांगल्या लयीत दिसत होता आणि त्याने ३६ चेंडूत ४६ धावा केल्या, ज्यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता. त्याने आपल्या डावाच्या ३७ व्या चेंडूवर अजून एक चौकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी चार्ल्स अमिनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करत लाँग-ऑनवर एक शानदार झेल घेतला.
पीएनजीचा कर्णधार असद वाला गोलंदाजी करत असताना त्याने एक चेंडू बाहेर टाकला, शाकिबने त्याला लाँग-ऑन सीमारेषेवर चेंडू टोलवण्याच्या प्रयत्न केला, पण त्याला हा चेंडू फार दूरपर्यंत टोलवता आला नाही. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असतानाच अमिनीने पुढे येत उत्कृष्ट झेल घेतला आणि त्याच्या संघाला विकेट मिळाली.
https://www.instagram.com/reel/CVSfjNtFa9N
बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पीएनजीचा डाव झटपट आवरला गेला. पीएनजीच्या संघाने २४ धावांत ५ गडी गमावले. पीएनजीच्या सुरुवातीच्या सात खेळाडूंपैकी कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. आठव्या क्रमांकावर उतरलेल्या किप्लिन दोरीगाने नाबाद ४६ धावा करत संघाला ९० धावांच्या पुढे नेले. संघ १९.३ षटकांत ९७ धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून शाकिब व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज मोहम्मद सैफुद्दीन आणि तस्किन अहमदने २-२ विकेट्स घेतल्या. बांगलादेशने ८४ धावांनी हा सामना जिंकला.
तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाहने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संघाची सुरुवात चांगली झाली नाही. मोहम्मद नईम (०) पहिल्याच षटकात बाद झाला. यानंतर लिटन दास (२९) आणि शाकिब अल हसन (४६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. माजी कर्णधार मुशफिकुर रहिमला केवळ ५ धावा करता आल्या.
बांगलादेश संघाने १०१ धावांवर ४ गडी गमावले होते. पण कर्णधार महमूदुल्लाहने ५० धावा करून संघाची धुरा सांभाळली. त्याने २८ चेंडूंचा सामना केला. त्याने आपल्या डावात ३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. आफिफ हुसेनने १४ चेंडूत २१ धावा केल्या तर सैफुद्दीनने ६ चेंडूत नाबाद १९ धावा केल्याने, बांगलादेश संघाने निर्धारित २० षटकांत ७ गडी बाद १८१ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘जे झालं त्याचा आम्ही विचार करत नाही, आता फक्त भारताला पराभूत करायचंय’, आझमची चेतावणी
टी२० विश्वचषकात ‘हे’ भारतीय करतील सर्वाधिक धावा अन् घेतील सर्वाधिक विकेट्स, ब्रेट लीची भविष्यवाणी






