Charlie Cassell World Record : क्रिकेटविश्वात आजवर अनेक अवलिया वेगवान गोलंदाज होऊन गेले आहेत. डेल स्टेन, शोएब अख्तर, ब्रेट ली, मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह अशी मातब्बर वेगवान गोलंदाजांची न संपणारी यादी आहे. आता या यादीत एका नव्या वेगवान गोलंदाजाचे नाव जोडले गेले आहे. परंतु या गोलंदाजाची खासियत म्हणजे, त्याने पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आजवर वनडे क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही वेगवान गोलंदाजाला न जमलेला पराक्रम केला आहे. हा वेगवान गोलंदाज आहे, स्कॉटलंडचा चार्ली कॅसेल.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 मध्ये सोमवारी (22 जुलै) ओमान विरुद्ध स्कॉटलंड यांच्यातील सामन्यांदरम्यान या गोलंदाजाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्पर्धेतील 16व्या सामन्यात स्कॉटलंडच्या वेगवान गोलंदाज चार्ली कॅसेलने ओमानविरुद्ध पदार्पण केले. हा पदार्पणाचा सामना या गोलंदाजासाठी काही स्वप्नापेक्षा कमी नव्हता. आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात चार्लीने विश्वविक्रम केला.
या सामन्यात चार्लीने स्कॉटलंडकडून पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. यानंतरही तो थांबला नाही आणि लगेचच दुसऱ्या चेंडूवर त्याने पुन्हा विकेट घेतली. यासह, पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या दोन चेंडूवर सलग विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. या षटकाच्या चौथ्या चेंडूवरही त्याने विकेट घेतली. अशाप्रकारे चार्लीने आपल्या पहिल्याच षटकात एकूण 3 फलंदाजांना बाद केले आणि एकही धाव खर्च केली नाही.
पहिल्याच सामन्यात इतक्या विकेट्स घेतल्या
चार्लीने आपल्या पहिल्याच षटकात विश्वविक्रम केल्यानंतर आपली अप्रतिम कामगिरी सुरूच ठेवली. या सामन्यात त्याने एकूण 5.4 षटके टाकली आणि केवळ 21 धावा देत 7 फलंदाजांना आपले बळी बनवले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. याआधी दोन गोलंदाजांनी पदार्पणाच्या सामन्यात 6-6 विकेट्स घेतल्या होत्या.
5️⃣.4️⃣ overs
1️⃣ maiden
2️⃣1️⃣ runs
7️⃣ wicketsCharlie Cassell with the 𝘽𝙀𝙎𝙏 𝙀𝙑𝙀𝙍 figures on ODI debut 🤯🤩🔥#FollowScotland pic.twitter.com/EXSw7ixucZ
— Cricket Scotland (@CricketScotland) July 22, 2024
ओमानच्या फलंदाजांची वाईट अवस्था
चार्लीच्या या घातक गोलंदाजीमुळे ओमानच्या फलंदाजांची अवस्था वाईट झाली होती. संपूर्ण संघ 21.4 षटकेच फलंदाजी करू शकला आणि 91 धावा करून सर्वबाद झाला. ओमानकडून प्रतीक आठवलेने सर्वाधिक 34 धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. स्कॉटलंडकडून चार्लीशिवाय ब्रॅड करी, ब्रँडन मॅकमुलेन आणि गेविन मेन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
करोडोंची संपत्ती, एकापेक्षा एक महागड्या गाड्या, ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा जगतोय असे आलिशान आयुष्य
महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार 16 संघ, आयसीसीनं दिली मंजुरी
आयसीसी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आलेले 4 मोठे निर्णय, टी20 विश्वचषकादरम्यान झालं होतं मोठं नुकसान!