गोवा| इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) यंदाच्या पर्वात १४ सामन्यांत केवळ १ विजय मिळवणाऱ्या एससी ईस्ट बंगालकडे आता गमावण्यासारखे काहीच नाही. पण, चेन्नईयन एफसीच्या आशा अजूनही कायम आहेत आणि त्यामुळे बुधवारी ते दुबळ्या ईस्ट बंगालविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
मारीओ रिव्हेरा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ईस्ट बंगालचे उपांत्य फेरीच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे, परंतु त्यांना अखेरच्या काही सामन्यांत कामगिरीत सुधारणा करून लीगचा निरोप घेण्याची संधी आहे. त्यामुळे चेन्नईयनविरुद्ध ते संपूर्ण ताकदीने मैदानावर उतरणार आहेत. ईस्ट बंगालविरुद्ध १४ सामन्यांत प्रतिस्पर्धींनी २८ गोल्स केले आहेत आणि यंदाच्या लीगमधील ही दुसरी सर्वात खराब कामगिरी आहे. रिव्हेरा यांच्या येण्यानं संघाच्या रणनीतीत बदल पाहायला मिळाला आहे, परंतु त्यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.
”आता निकालापेक्षा सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. कधीकधी चांगले खेळूनही पराभवाचा सामना करावा लागलो. त्यामुळे आमची कामगिरी ही निकालापेक्षा नक्कीच चांगली झाली आहे आणि खेळाडू आत्मविश्वासानं खेळ करण्यास सज्ज आहेत,”असे रिव्हेरा यांनी सांगितले. ब्राझिलीयन स्ट्रायकर मार्सेलो रिबेरो याला मागच्या लढतीत सुरुवातीपासून मैदानावर उतरवले होते आणि रिव्हेरा यांच्या मते अँटोनियो पेरोसेव्हिच याच्यासोबतचे त्याचा ताळमेळ सुरेख आहे. ते म्हणाले, मार्सेलो आणि पेरोसेव्हिच यांचा एकत्र खेळ पाहण्यासारखा आहे. मार्सेलोला जरी इंग्रजी बोलता येत नसले तरी त्यांच्याताळी ताळमेळ उत्तम आहे.
दुसरीकडे चेन्नईयनचा संघ १३ सामन्यांत १८ गुणांसह ७ व्या क्रमांकावर आहे आणि ईस्ट बंगालविरुद्धचा विजय त्यांना अव्वल चौघांत पोहचवू शकतो. लालिअनझुआला छांग्टे हा लोनवर मुंबई सिटी एफसीच्या ताफ्यात दाखल झाला आहे, परंतु मुख्य प्रशिक्षक बोरीदार बँडोव्हिच यांच्या मते त्याची उणीव भरून काढण्यासाठी संघात अन्य खेळाडू आहेत.
”आम्ही त्याचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु काही खेळाडू खूपच महाग होते, तर अन्य खेळाडू करारबद्ध आहेत. त्यामुळे आता आहेत त्या खेळाडूंसोबत आम्हाला खेळावे लागणार आहे. ३-५-२ याच फॉरमेशननुसार आम्ही मैदानावर उतरणार आहोत. कोमान, एरियल आणि थापा यांच्यामुळे मधलीफळी मजबूत आहे,” असे बँडोव्हिच यांनी सांगितले.