इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाचा लिलाव (IPL Auction 2022) १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. बंगळुरू यथे झालेल्या या लिलावात अनेक खेळाडूंना कोट्यावधी रुपयांच्या बोली लागल्या, तर अनेक दिग्गज खेळाडूंना कोणत्याच फ्रँचायझीने पसंती दाखवली नाही. यात सुरेश रैना याचाही (Suresh Raina) समावेश आहे. विशेष म्हणजे १० वर्षांहून अधिक काळापासून रैनाने ज्या संघाचे प्रतिनिधित्त्व केले, त्या चेन्नई सुपर किंग्स संघानेही त्याच्यात रस दाखवला नाही. आता यामागचे कारण सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे.
‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रैनाची आयपीएल लिलावासाठी २ कोटी मुळ किंमत होती. पण, त्याला त्याच्या मुळ किंमतीत देखील विकत घेण्यास कोणी रस दाखवला नाही. सीएसके (CSK) संघानेही आपल्या या जुन्या शिलेदारावर विश्वास न दाखवल्याची बरीच चर्चा झाली.
मात्र, आता रैनाला खरेदी न करण्यामागचे कारण स्पष्ट करताना विश्वनाथन यांनी सांगितले की, ‘१२ वर्षांपासून रैनाने सीएसकेसाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. नक्कीच, रैनाला संघात न घेणे आमच्यासाठी कठीण निर्णय होता, पण त्याचवेळी आपल्याला हे देखील समजून घ्यावे लागेल की, संघसंयोजन फॉर्म आणि खेळाडूंवर अवलंबून असते. फॉर्म आणि संघबांधणी यामागचे मोठे कारण आहे. आमच्या विचारानुसार तो या संघात फिट बसत नव्हता.’
तसेच ते पुढे म्हणाले, त्यांना फाफ डू प्लेसिसची कमी देखील यंदा जाणवेल. डू प्लेसिस देखील गेली अनेक वर्षे सीएसके संघाचा भाग होता. मात्र, आयपीएल २०२२ लिलावात त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने खरेदी केले.
रैनाने आयपीएलमध्ये २०५ सामने आत्तापर्यंत खेळले असून ५५२८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या १ शतक आणि ३९ अर्धशतके केली आहेत. तसेच रैना २००८ ते २०१५ आणि २०१८ ते २०२१ पर्यंत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला, तर २०१६ आणि २०१७ साली तो गुजरात लायन्स संघाचा भाग होता. पण रैनासाठी २०२१ हंगाम कामगिरीच्या दृष्टीने फारसा खास नव्हता. त्याने १२ सामन्यात केवळ १६० धावा केल्या होत्या. तसेच तो गेल्या वर्षभरात फारसे क्रिकेटही खेळलेला नाही. त्याचमुळे त्याचा खराब फॉर्मचा परिणाम आयपीएल लिलावात दिसला आहे.
दरम्यान, आयपीएल २०२२ साठी चेन्नईने आपल्या संघात लिलावातून २१ खेळाडू खरेदी केले, तर लिलावापूर्वीच त्यांनी ४ खेळाडू संघात कायम केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
Photo: वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकेत दोन हात करण्यास टीम इंडिया सज्ज! पंत सांभाळणार ‘उपकर्णधारपद’
रैनासह ‘या’ ४ भारतीयांना मेगा लिलावात नाही मिळाला खरेदीदार, आता आयपीएल करियरवर लागणार कायमचा ब्रेक!
दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या राहुलने गर्लफ्रेंड अथियासोबत शेअर केला ‘व्हॅलेंटाईन’, फोटो एकदा बघाच