मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात मंगळवारी (१२ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना पार पडला. हंगामातील या २२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने २३ धावांनी विजय मिळवला. हा चेन्नईचा हंगामातील पहिला विजय ठरला आहे. यासह त्यांनी या सामन्यात एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.
चेन्नईची बेंगलोरशी बरोबरी
मंगळवारी बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकत चेन्नईला (Chennai Super Kings) प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चेन्नईनेही या आमंत्रणाचा स्विकार करत ताबडतोड फलंदाजी केली आणि धावफलकावर २० षटकांअखेर ४ बाद २१६ धावा लावल्या. याबरोबर चेन्नईने बेंगलोरच्या एका विक्रमाशी बरोबरी केली.
आयपीएल इतिहासात चेन्नईने एका डावात २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही २१ वी वेळ होती. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावसंख्या उभारणाऱ्या संघांच्या यादीत चेन्नईने अव्वल स्थानी असलेल्या बेंगलोरशी बरोबरी केली. बेंगलोरनेही आत्तापर्यंत २१ वेळा २०० धावांचा टप्पा गाठला आहे. या यादीत चेन्नई आणि बेंगलोरच्या पाठोपाठ मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी १६ वेळा २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे (Most 200s in IPL history).
तसेच आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) सामन्यांच्या विचार करायचा झाल्यास चेन्नईने दुसऱ्यांदा २०० धावांचा टप्पा ओलांडला. त्यांनी यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळताना २१० धावा उभारल्या होत्या. पण, त्या सामन्यात लखनऊने चेन्नईला पराभूत केले होते.
उथप्पा-दुबेची दमदार भागीदारी
प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईकडून पहिल्या दोन विकेट्स गेल्यानंतर रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) आणि शिवम दुबे (Shivam Dube) या दोघांची जोडी जमली. या दोघांनी बेंगलोरच्या गोलंदाजांची पुरती भुई थोडी करत १६५ धावांची भागीदारी केली. त्याचमुळे चेन्नईला २१६ धावा उभारता आल्या. उथप्पाने ५० चेंडूत ८८ धावा केल्या. यामध्ये त्याने ९ षटकारांसह ४ चौकार मारले. तसेच शिवमने ४६ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांसह ९५ धावांची खेळी केली (CSK vs RCB).
त्यानंतर २१७ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बेंगलोरकडून शाहबाद अहमदने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. तसेच सुयश प्रभूदेसाईने १८ चेंडूत ३४ आणि दिनेश कार्तिकने १४ चेंडू ३४ धावांची आक्रमक खेळी करत बेंगलोरला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अन्य कोणाची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे बेंगलोरला २० षटकांत ९ बाद १९३ धावा करता आल्या.
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावसंख्या उभारणारे संघ
२१ वेळा – चेन्नई सुपर किंग्स
२१ वेळा – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
१६ वेळा – मुंबई इंडियन्स
१६ वेळा – पंजाब किंग्स
१३ वेळा – कोलकाता नाईट रायडर्स
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022| पहिल्या विजयाची आस असलेल्या मुंबईसमोर पंजाबचे आव्हान; केव्हा-कुठे होणार सामना, घ्या जाणून
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दंडावर काळी पट्टी बांधून का खेळले बेंगलोर संघाचे खेळाडू? घ्या जाणून
उथप्पा आणि दुबेची आयपीएलमधील ऐतिहासिक भागीदारी; ‘या’ यादीत गाठला थेट अव्वल क्रमांक