नवी दिल्ली | आयपीएलमध्ये बुधवारी (7 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला 10 धावांनी पराभूत केले. या सामन्यात अनुभवी फलंदाज केदार जाधवने संथ खेळी केली. त्याने 12 चेंडूत केवळ 7 धावा केल्या. यावेळी त्याने 8 चेंडू निर्धाव खेळले. तसेच या सामन्यात केदार जाधवला अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या आधी फलंदाजीसाठी पाठविण्यात आले होते.
त्यामुळे सध्या केदारच्या संथ खेळीवर आणि त्याला जडेजा आणि ब्रोव्होच्या आधी फलंदाजीला पाठविण्याच्या निर्णयावर जोरदार टिका होत आहे.
पण आता चेन्नईचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी म्हटले आहे की ‘केदार फिरकीपटूंविरुद्ध चांगला खेळतो व तो धावा करेल आणि त्यानंतर जाडेजा फिनिशर म्हणून काम करेल असे वाटले होते. पण हे घडले नाही.’
वेगवान धावा केल्या नसल्यामुळे गमावला सामना
सामन्याबद्दल बोलताना फ्लेमिंग म्हणाले की, “चेन्नईच्या डावाच्या 11 ते 14 षटकांदरम्यान केवळ 14 धावा आल्याने आमच्या फलंदाजांनी सामन्यावरची पकड गमावली, जर सलामीवीर शेन वॉटसन किंवा अनुभवी फलंदाज अंबाती रायडू नाबाद राहिले असते सामन्याचे चित्र वेगळे असते. आम्ही वेगवान धावा करू शकलो नाही. त्यामुळेच आम्ही हा सामना गमावला.”
एमएस धोनीने केली संथ खेळी
यावेळी कर्णधार एमएस धोनीदेखील खेळपट्टीवर खेळत होता. धोनीला 12 चेंडूत फक्त 11 धावा करता आल्या. वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो त्रिफळाचित झाला. जोपर्यंत धोनी खेळपट्टीवर खेळत होता तोपर्यंत चेन्नईच्या हातात सामना होता. पण नंतर धावगती वाढत गेली. धोनीने वॉटसनबरोबर 2 तर सॅम करनबरोबर 28 धावांची भागीदारी केली, ज्यामध्ये धोनीने 10 चेंडूत 10 धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत धोनीची संथ खेळी देखील चेन्नईला महागात पडली.
अतिरिक्त फलंदाजांची आवश्यकता नाही
संघाच्या फलंदाजीबद्दल बोलताना फ्लेमिंग म्हणाले की, “ आमच्याकडे संतुलित संघ आहे. काही मोठे फटके खेळणारे फलंदाजही आहेत. संघात अतिरिक्त फलंदाजाची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही.”
तो निर्णय एमएस धोनीचा होता
फिरकीपटू रवींद्र जडेजाला संथ खेळपट्टीवर गोलंदाजी न देण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, “हा एमएस धोनीचा निर्णय होता. मी हे निर्णय घेत नाही. माझ्या मते सामन्यादरम्यान हवा सुरु असल्याने त्याला गोलंदाजी दिली नसेल. आमचे वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत.”






