आयपीएलचा १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. परंतु त्याआधीच चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठे धक्के बसले आहेत. त्यांचा मुख्य फलंदाज सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळे आयपीएलच्या या हंगामातून बाहेर पडला आहे. असे असतानाच संघातील काही सदस्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यामध्ये पुण्याच्या ऋतुराज गायकवाडचा समावेश आहे. तो मागील २ वर्षापासून चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे. पण अजून त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळालेली नाही. परंतु यावर्षी त्याला ती संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र आता त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.
माध्यमांतील काही वृत्तांनुसार चेन्नई सुपर किंग्स संघातील कमीत कमी १० सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये ऋतुराज व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरचाही समावेश आहे.
तसे पाहिले तर युएईला पोहचल्यानंतर प्रत्येक संघातील सदस्यांची विमानतळावर कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ६ दिवसांसाठी सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यावेळी पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात येणार होती. या चाचण्यांनंतरच चेन्नई सुपर किंग्सच्या संघातील काही सदस्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्सच्या सदस्यांचा क्वारंटाईनचा कालावधी वाढविण्यात आल्याने त्यांच्या ट्रेनिंगलाही उशिरा सुरुवात होईल. पण या प्रकरणाबद्दल अजून आयपीएल किंवा चेन्नई सुपर किंग्सकडून कोणतेही औपचारिक भाष्य करण्यात आलेले नाही.