‘इंडिया का त्योहार’ म्हटला जाणारा इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. एकीकडे सर्वांना या नव्या हंगामाचे वेध लागले आहे. दुसरीकडे अनेकांच्या मनात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी याचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असणार की काय?, हा प्रश्न घोंगावत आहे.
‘थाला’ नावाने आयपीएल प्रेमींमध्ये विख्यात असलेला धोनी आता ३९ वर्षांचा झाला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता त्याच्या आयपीएल निवृत्तीचा मुद्दा पुढे येणे साहजिक आहे.
आयपीएलचा आगामी हंगाम ठरू शकतो मोठे कारण!
आयपीएल २०२१ धोनीचा अंतिम हंगाम समजण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव. येत्या वर्षी आयपीएलमध्ये एका नव्या संघाची भर पडण्याची दाट शक्यता आहे. अशात जवळपास संघातील बरेच खेळाडू लिलावात उतरतील. आता प्रत्येक संघाकडे असलेल्या खेळाडूंपैकी काहींना संघात कायम ठेवले जाईल आणि उर्वरित खेळाडूंना लिलावात उतरावे लागेल.
धोनीची आजवरची कामगिरी पाहता चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) त्याला रिटेन करेल हे जवळपास ठरल्यात जमा आहे. परंतु त्याला रिटेन केल्यानंतर सीएसकेला संघ बांधणीसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. याबरोबरच त्याला रिटेन केल्यानंतर धोनी पुढील किती वर्षे आयपीएल खेळेल?, हा प्रश्नही उपस्थित होतो. त्यामुळे कदाचित धोनी स्वत:च आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेऊ शकतो.
आयपीएल २०२० मध्ये धोनीची कामगिरी नव्हती खास
आयपीएल २०२० मध्ये धोनीचे प्रदर्शन जास्त खास राहिले नव्हते. त्याने या हंगामात १४ सामने खेळताना केवळ २०० धावा केल्या होत्या. यात नाबाद ४७ धावा ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली होती. अर्थात धोनीला गतवर्षी एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. हे त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वाईट प्रदर्शन राहिले होते. यापुर्वीच्या प्रत्येक हंगामात धोनीने कमीत कमी २८० धावांचा टप्पा ओलांडला होता.
गेम टाइमच्या उणीवेचा धोनी करतोय सामना
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीला जास्त क्रिकेट खेळण्याची संधी मिळताना दिसत नाही. त्याने २०१९ साली विश्वचषक उपांत्य फेरीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याने थेट आयपीएल २०२० द्वारे क्रिकेट मैदानावर पुनरागमन केले होते. अशात गेम टाइमची कमी त्याच्या खेळात स्पष्टपणे जाणवली.
आयपीएल २०२० नंतरही धोनी क्रिकेट खेळताना दिसला नाही. अशात यावेळीही गेम टाइम उणीवेचे परिणाम त्याच्या प्रदर्शनावर दिसू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल तोंडावर असतानाही सीएसकेचा उपकर्णधार नाही निश्चित, रैना-जडेजा पडले पेचात!
आयपीएल २०२१ चा मार्ग मोकळा! कोरोना सावटाखाली मुंबईच्या स्टेडियवमर सराव करण्याची मिळाली परवानगी
आयपीएल प्रेमींसाठी खुशखबर! वानखेडे स्टेडियमचा ग्राउंड स्टाफ सुटला कोरोनाच्या तावडीतून