आयपीएल 2025पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. तत्पूर्वी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) आयपीएलमध्ये (IPL) जुना नियम परत आणण्याची सूचना केली आहे, ज्यामुळे त्यांना 2025च्या हंगामासाठी त्यांचा महान खेळाडू महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येईल. या प्रस्तावामुळे आयपीएल फ्रँचायझींमध्ये वाद निर्माण झाला आहे आणि लीगमधील खेळाडूंचे मूल्यांकन आणि निष्पक्षता यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
चेन्नई सुपर किंग्जने (CSK) 2008 ते 2021 पर्यंत लागू असलेल्या जुन्या नियमाचा प्रस्ताव आयपीएल परिषदेकडे दिला आहे. या नियमानुसार, एखाद्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच किंवा त्याहून अधिक वर्षे झाली असतील, तर त्याची गणना अनकॅप्ड कॅटेगरीत केली जावी.
मुंबईमध्ये आयपीएल परिषद आणि 10 फ्रँचायझी यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान, सीएसकेने जुना नियम परत आणण्याचा प्रस्ताव दिला. 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज धोनीला संघात कायम ठेवण्याची त्यांची इच्छा असल्याचे दिसते. हा बदल अंमलात आणल्यास, सीएसके धोनीला पुढील हंगामासाठी त्याच्या सध्याच्या 12 कोटी रुपयांच्या रिटेन्शन खर्चापेक्षा कमी किमतीत संघात कायम ठेवेल.
मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत निवृत्त झालेल्या भारतीय खेळाडूंच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. ज्या भारतीय खेळाडूंनी पाच वर्षांपासून राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले नाही अशा भारतीय खेळाडूंना आयपीएल मेगा लिलावात त्यांची मूळ किंमत कमी करण्याची अनुमती देणारा प्रस्ताव फ्रँचायझींनी एकमताने मान्य केला.
महेंद्रसिंह धोनीबद्दल (Mahendra Singh Dhoni) बोलायचं झालं तर त्याचं वय सध्या 43 वर्ष आहे. त्यानं शेवटच्या आयपीएल हंगामात सीएसकेसाठी 14 सामने खेळले. त्यामध्ये 8 डावात फलंदाजी करताना त्यानं 161 धावा केल्या. यादरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 53.67 राहिली तर स्ट्रईक रेट 220.55 राहिला. धोनीनं शेवटच्या हंगामात 13 षटकार आणि 14 चौकार लगावले. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 37 राहिली.
महत्त्वाच्या बातम्या-
जगातला कोणताच फलंदाज मोडू शकणार नाही, सचिन तेंडुलकरचे हे 5 वर्ल्ड रेकाॅर्ड
ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेचं प्रोमोशन, मध्य रेल्वेत आता ऑफिसर म्हणून काम करणार!
टी20 विश्वचषक झाला आता टीम इंडियाचे लक्ष विश्वचषकावर..! कर्णधारानं सांगितलं पुढचं नियोजन