गोवा: उपांत्य फेरीची चुरस वाढली असतानाच गुरुवारी (३ मार्च) पीजेएन स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात गुणतालिकेत तळाला असलेल्या चेन्नईयन एफसीला (Chennaiyin FC) हरवून हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठवा हंगामातील प्ले-ऑफ फेरी नक्की करण्याचे लक्ष्य एटीके मोहन बागानने (Mohun Bagan) ठेवले आहे.
जमशेदपूर एफसी आणि हैदराबाद एफसीनंतर मोहन बागानला बाद फेरी निश्चितीचे वेध लागलेत. सलग चौदा सामन्यात अपराजित असलेल्या एटीके मोहन बागानने १८ सामन्यांतून ३४ गुणांसह ताज्या गुणतालिकेत तिसरे स्थान राखले आहे. सलग दुसऱ्या हंगामात त्यांना अंतिम चार क्लबमध्ये स्थान मिळवण्याची संधी चालून आली आहे. मोहन बागानला आणखी एक विजय थेट जमशेदपूर आणि हैदराबादच्या पंक्तीत बसवू शकतो.
एटीकेसाठी हुआन फेरँडोसह ह्युगो बॉमॉस तसेच जॉनी कौका हे मॅचविनर ठरलेत. फॉरवर्ड लिस्टन कोलॅकोनेही मोहन बागानच्या सातत्यामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. एटीकेकडून यंदाच्या हंगामात कोलॅकोने सर्वाधिक ६ गोल केलेत. मनवीर सिंग (५ गोल) त्याच्या पाठोपाठ आहे. चेन्नईयनविरुद्धचा सामना मोहन बागानसह कोलॅकोसाठीही महत्त्वपूर्ण आहे. गुरुवारचा सामना हा त्याचा आयएसएलमधील ५०वा सामना आहे. त्यात खेळ उंचावून क्लबची उपांत्य फेरी निश्चिम करण्याचा कोलॅकोचा मानस आहे. मात्र, मोहन बागानच्या उंचावलेल्या सांघिक कामगिरीत भारताच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे. आजवरच्या एकूण ३६ गोलपैकी निम्म्याहून अधिक गोल इंडियन्स फुटबॉलपटूंनी केलेत.
चेन्नईयन एफसीसाठी आठवा हंगाम वाईट ठरला. १९ सामन्यांत त्यांना केवळ २० गुण मिळवता आलेत. ताज्या क्रमवारीत ते आठव्या स्थानी आहेत. वास्तविक पाहता पहिल्या चार सामन्यांत ते अपराजित होते. मात्र, त्यानंतर खेळ ढेपाळला. मागील ७ सामन्यांत चेन्नईयनला पाच पराभव पाहावे लागले. मात्र, बाद फेरीचे आव्हान संपुष्टात आले तरी एटीके मोहन बागानविरुद्ध खेळ उंचावून त्यांना हंगामाचा शेवट गोड करण्याला वाव आहे.
आठव्या हंगामात पहिल्या लेगमध्ये चेन्नईयनने मोहन बागानला १-१ असे बरोबरीत रोखले होते. त्यामुळे टॉप संघात समावेश असला तरी एटीकेला प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखून चालणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आयएसएल: जमशेदपूरचा डबल धमाका; प्ले-ऑफ फेरीवर शिक्कामोर्तब
क्रीडाविश्वातूनही रशियाची कोंडी! फिफासह ऑलिम्पिक संघटनेने केली कडक कारवाई