भारतीय संघाला श्रीलंका संघाविरुद्ध(IND vs SL) मायदेशात फेब्रुवारीच्या शेवटी टी२० मालिका खेळायची आहे. या सामन्यासाठी निवड समितीने शनिवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय संघाची घोषणा केली आहे. टी२० आणि कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर रोहित शर्माला(Rohit sharma) कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचा संघांचे नेतृत्व करणार आहे.
संघ जाहीर होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा शनिवारी (१९ फेब्रुवारी) व्हर्च्युअल पत्रकार परिषदेद्वारे संघ निवडीबद्दल बोलण्यासाठी सामील झाले होते. त्यांनी दोन्ही स्वरुपांसाठी निवडलेल्या संघाबद्दल सांगितले. त्याबरोबरच पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देखील दिली आहेत. पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्यावर विचारलेल्या प्रश्नावर चेतन शर्मा नाराज झाले. त्यांना इतका राग आला की त्यांनी पत्रकाराचा मुद्दा कापला आणि मुद्दा उपस्थित करत बसू नका असे सांगितले
पत्रकाराने हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, हार्दिक देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नाही, यामागचे कारण काय? याबाबत बोर्ड त्यांच्यावर काही कारवाई करणार आहे की नाही? कारण आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होईल आणि तेथे धावा केल्यानंतर त्याची संघात निवडही होईल हे निश्चित आहे.
पत्रकाराच्या प्रश्नावर चेतन शर्मा भडकले आणि म्हणाले, “संघ निवडणे तुमचे काम नाही. हार्दिकची संघात निवड होणार, हे सांगणारे तुम्ही कोण आहात? मी आणि माझ्यासोबत आणखी चार जण निवड समितीचा भाग आहोत. संघात कोणाची निवड होणार आणि कोणाची निवड होणार नाही हे ठरवणे आमचे काम आहे. आम्हाला आमचे काम करू द्या आणि तुम्ही तुमचे करा.”
हार्दिक दुखापतीमूळे काही काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. बीसीसीआय आणि निवड समितीने हार्दिकला त्याच्या फिटनेसवर काम करण्यास सांगितले होते. हार्दिकच्या पाठीची काही काळापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती.
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलूचा पाकिस्तान बोर्डावर धोखाधडीचा आरोप, अर्ध्यातूनच पीएसएलमधून घेतली माघार
रणजी ट्रॉफीत आले अब्दुल समदचे वादळ! झंझावाती शतकासह मोडले अनेक विक्रम