भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारानं रणजी ट्रॉफीतील त्याचं 25वं शतक झळकावलं आहे. सोमवारी (21 ऑक्टोबर) छत्तीसगड विरुद्ध सौराष्ट्रकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पुजारानं 197 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. छत्तीसगडनं पहिल्या डावात 7 बाद 578 धावा केल्या आहेत. पुजारानं या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र आणि काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्ससाठी खेळताना 16 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सहा शतकं झळकावली आहेत.
पुजाराचं हे 66वं प्रथम श्रेणी शतक आहे. यासह त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत ब्रायन लाराला मागे टाकलं. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये पुजारा सर्वाधिक धावा करणारा आणि शतक करणारा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याच्या पुढे फक्त लिटल मास्टर सुनील गावस्कर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे दिग्गज खेळाडू आहेत.
यासह चेतेश्वर पुजारानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 21,000 धावाही पूर्ण केल्या. त्यानं 273व्या डावात ही कामगिरी केली. गेल्या वर्षी ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळल्यापासून तो भारताच्या कसोटी संघाबाहेर आहे. मात्र असं असूनही त्यानं लाल चेंडूच्या फॉरमॅटमध्ये धावा करणं सुरूच ठेवलं आहे. 36 वर्षीय पुजारानं गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात आठ सामन्यांत 69.08 च्या सरासरीनं 829 धावा केल्या होत्या.
रणजी ट्रॉफीमधील सक्रिय खेळाडूंबाबत बोलायचं झाल्यास, पुजाराच्या 25 शतकांच्या पुढे फक्त पारस डोगरा (30 शतकं) आहे. तसेच सितांशु कोटकनंतर पुजारा हा सौराष्ट्रासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे भारतीय
81 – सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर
68 – राहुल द्रविड
66 – चेतेश्वर पुजारा
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय
25834 – सुनील गावस्कर
25396 – सचिन तेंडुलकर
23784 – राहुल द्रविड
21015 – चेतेश्वर पुजारा
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीचं काय होणार? बीसीसीआयनं पाकिस्तानचा हा प्रस्ताव धुडकावला! संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप विजयामागे भारताचा हात, कर्णधार सोफी डेव्हाईननं केला मोठा खुलासा
अर्जुन तेंडुलकरचा गोलंदाजीत जलवा, संघाला मिळवून दिला एकतर्फी विजय!