भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननं बुधवारी (18 डिसेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर अश्विननं पत्रकार परिषदेत आपल्या कारकिर्दीतून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
तिसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी ब्रेक दरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्याशी बोलताना अश्विन खूपच भावूक दिसला. त्यानंतर त्याच्या निवृत्तीची बातमी समोर आली. काही वेळानं अश्विननं स्वतः याची घोषणा केली. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेदरम्यान अश्विनच्या निवृत्तीच्या निर्णयावर भारताचे दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि हरभजन सिंग यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
चेतेश्वर पुजारानं लाइव्ह शोदरम्यान अश्विनच्या निवृत्तीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. मालिकेच्या मध्यभागी निवृत्ती जाहीर करण्याचा अश्विनचा निर्णय समजण्यापलीकडचा आहे, असं तो म्हणाला. पुजारा म्हणाला की, संघ व्यवस्थापनाशी काय चर्चा केली हे मला माहीत नाही पण असा अचानक निर्णय घेणं जरा अवघड गेलं असावं. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगही अश्विनच्या या निर्णयानं थोडा आश्चर्यचकित दिसला.
हरभजन सिंग म्हणाला की, “अश्विननं भारतासाठी खूप विकेट घेतल्या आहेत. असा निर्णय घेण्यापूर्वी त्यानं खूप विचार केला असेल. पण ज्या पद्धतीनं त्यानं मालिकेच्या मध्यावर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, त्यावरून त्याला आगामी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही हे माहीत असावं. टीम मॅनेजमेंट भविष्यासाठी त्याचा विचार करत नाही.”
या दोन्ही दिग्गजांचा हा इशारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या जोडीकडे असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा –
ब्रेकिंग : आर. अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का, भारताचे खेळाडू रडले
भारताचा फिरकीचा जादुगार रविचंद्रन अश्विनची संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द…!
रिटायरमेंटनंतर अश्विन आता आयपीएलमध्ये खेळणार? पाहा निवृत्तीच्या भाषणात काय म्हणाला