भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्ये वनडे चषक खेळत आहे. ससेक्स संघाकडून खेळणारा पुजारा या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. भारतीय फलंदाजाने 4 सामन्यात 2 शतके ठोकली आहेत. इंग्लंडमध्ये आपल्या उत्कृष्ट फॉर्मने पुजारा पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्यास इच्छुक आहे. याबाबत आता त्याने एक प्रतिक्रिया दिली.
वनडे चषक स्पर्धेत ससेक्स संघाकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने सॉमरसेट संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नाबाद 117 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तत्पूर्वी, नॉर्थंट्सविरुद्धच्या सामन्यात पुजाराने 119 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 106* धावा केल्या. पुजारा या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 4 सामन्यांच्या 4 डावात 151 च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत.
या खेळा नंतर बोलताना तो म्हणाला,
“भारतीय संघात पुनरागमन करण्याची अपेक्षा मी अजूनही सोडलेली नाही. माझ्या बॅटमधून धावा येत आहेत आणि मला अपेक्षा आहे की, मी पुन्हा एकदा भारतीय संघासाठी खेळू शकतो.”
पुजाराने भारतीय संघासाठी शेवटचा सामना आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये खेळला होता. ज्यामध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. या सामन्यात पुजाराने पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 27 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली, ज्यामध्ये पुजाराला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर अनेकांनी त्याची कारकीर्द समाप्त झाल्याचे म्हटले होते.
(Cheteshwar Pujara Hoping For His Team India Comeback After Centuries For Sussex)
महत्वाच्या बातम्या-
अर्धशतक झळकावताच जयसवालचा मोठा कारनामा, ‘या’ विक्रमात ‘हिटमॅन’च्या मांडीला मांडी लावून बसला यशस्वी
तो पुन्हा येणार? वर्ल्डकप राखण्यासाठी इंग्लंडचा प्लॅन ‘बिग बेन’, मंगळवारी होणार संघनिवड