भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना चालू असून आज (१५ फेब्रुवारी) या सामन्याचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाखेर नाबाद राहिलेले रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. १ बाद ५४ या धावसंख्येपासून पुढे तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करताना ही जोडी मोठी भागिदारी करुनच माघारी परतेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु सुरुवातीच्या षटकातच छोट्याशा चुकीमुळे पुजारा आपली विकेट गमावून बसला.
त्याचे झाले असे की, इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली तिसऱ्या दिवशीचे पहिले षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पुजाराने शॉर्ट लेगच्या दिशेने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून हवेत उडाला. अशात जवळच उभा असलेल्या ओली पोपने पटकन चेंडू पकडला आणि यष्टीरक्षक बेन फोक्सकडे फेकला. फोक्सने एक क्षणही वाया न घालवता चेंडू यष्टीला मारला.
दुसरीकडे पुजारा आपली विकेट वाचण्याच्या प्रयत्नात पटकन मागे वळला. परंतु त्याच्या हातून त्याची बॅट निसटली आणि दुर्दैवीपणे तो धावबाद झाला. अशाप्रकारे पुजारा दुसऱ्या डावात अवघ्या २३ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ७ धावा करु शकला.
https://twitter.com/1bbradfo/status/1361166143352807430?s=20
या सामन्याच्या पहिल्या डावातही पुजाराला मोठी खेळी करता आली नव्हती. ५८ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने अवघ्या २१ धावांवर तो बाद झाला होता. जॅक लीचने बेन स्टोक्सच्या हातून त्याला झेलबाद केले होते. आता पुजारा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली मैदानावर फलंदाजीसाठी उतरला. संघाच्या २४९ धावांच्या आघाडीत भर पाडत इंग्लंडला दुसऱ्या डावात मोठे आव्हान देण्याची जबाबदारी आता विराटच्या खांद्यावर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG 2nd Test Live : तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, रोहित-पुजारा जोडी फलंदाजीसाठी मैदानावर