भारतात एकीकडे इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम सुरू आहे. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंबरोबरच अनुभवी खेळाडू छाप पाडताना दिसत आहे, तर दुसरीकडे आयपीएलमध्ये संधी न मिळालेला भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये धडाकेबाज फलंदाजी करताना दिसत आहे.
चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) कोणत्याही संघाने संधी दिलेली नाही. त्यामुळे तो या काळात इंग्लंडला कौउंटी क्रिकेट (County Championship) खेळण्यासाठी गेला आहे. तो कौउंटी क्रिकेट चॅम्पियनशीपच्या सेकंड डिविजनमध्ये ससेक्स संघाकडून खेळत आहे. त्याने आत्तापर्यंत यावर्षी ससेक्सकडून (Sussex) ४ सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे त्याने चारही सामन्यात शतके ठोकली आहेत.
पुजाराचे सलग चौथे शतक
पुजाराने त्याचा चौथा सामना ससेक्सकडून मिडलसेक्सविरुद्ध खेळला आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात ससेक्सचे दोन्ही सलामीवीर शुन्यावर बाद होऊन माघारी परतले होते. पण त्यानंतर चेतेश्वर पुजाराने टॉम अस्लोपबरोबर शतकी भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला.
पुजाराने पुढे चांगली खेळी करताना शतकही पूर्ण केले. तो तिसऱ्या दिवसाखेर १४९ चेंडूत १२५ धावांवर नाबाद आहे. या खेळीत त्याने १६ चौकार आणि २ षटकार खेचले. त्याने शाहिन शाह आफ्रिदीविरुद्धही एक खणखणीत षटकार खेचला होता. पुजाराने ही खेळी करताना १३३ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले होते. त्याच्या या शतकामुळे ससेक्सने मिडलसेक्सविरुद्ध २७० धावांची आघाडी घेतली आहे.
या सामन्यात ससेक्सने पहिल्या डावात सर्वबाद ३९२ धावा केल्या होत्या. त्यानंतर मिडलसेक्सला पहिल्या डावात ३५८ धावा करता आल्या. त्यामुळे ससेक्सला ३४ धावांची आघाडी मिळाली होती.
पुजाराची ४ शतके
पुजाराने त्याचे पहिले शतक डर्बीशायरविरुद्ध केले आहे. त्याने या सामन्यात २०१ धावांनी नाबाद खेळी केली होती. त्यानंतर वूस्टरशायरविरुद्धही त्याने १०९ धावांची खेळी केली, तर डर्हमविरुद्धही त्याने २०३ धावांची द्विशतकी खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्जला धूळ चारल्यानंतर संजू सॅमसनने गायले या दोन खेळाडूंचे गुणगान; म्हणाला…
राजस्थान रॉयल्सकडून मिळालेला पराभव मयंक अगरवालच्या जिव्हारी; म्हणाला, ‘ते आम्हाला जमले नाही…’
क्या बात है! फक्त ३ खेळाडूंनाच जमला आयपीएलमध्ये ‘हा’ भन्नाट विक्रम, सुनील नारायणचाही समावेश