इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम आता केवळ २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ हंगामाला सुरुवात होईल. या हंगामात यंदा चेन्नई सुपर किंग्स संघाकडून चेतेश्वर पुजारा देखील खेळताना दिसणार आहे. पुजारीची ओळख ही एक कसोटीपटू म्हणून आहे. तसेच त्याच्या धीम्यागतीने खेळण्याबद्दलही सातत्याने चर्चा होत असते. मात्र, असे असतानाही चेन्नई सुपर किंग्सने त्याच्या क्षमतेवर विश्वास दाखवत त्याला संघात सामील करुन घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर आपण पुजाराच्या ट्वेंटी-ट्वेंटी कारकिर्दीबद्दल थोक्यात जाणून घेऊ.
टी२० क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात
पुजाराने भारतीय संघाकडून अजून एकदाही टी२० सामना खेळेलेला नाही. मात्र त्याने देशांतर्गत स्पर्धा आणि आयपीएमध्ये टी२० क्रिकेटप्रकारातील सामने खेळले आहेत. त्याने टी२० क्रिकेट प्रकारात १४ वर्षांपूर्वी ४ एप्रिल २००७ साली पदार्पण केले होते. त्यावेळी झालेल्या इंटर स्टेट टी२० स्पर्धेतून या क्रिकेट प्रकारात पदार्पण केले होते. त्याने पहिला टी२० सामना सौराष्ट्र संघाकडून महाराष्ट्र संघाविरुद्ध खेळला होता.
या सामन्यात महाराष्ट्राने सौराष्ट्रला ११७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने सौराष्ट्रकडून २२ चेंडूत नाबाद ४३ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला होता. या संपूर्ण स्पर्धेतच पुजाराची कामगिरी चांगली राहिली होती.
पुजाराचे टी२० क्रिकेटमध्ये एक शतक
पुजारा जरी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जात असला तरी त्याने त्याच्या टी२० कारकिर्दीत आक्रमक शतकही केले आहे. त्याने २०१९ सालच्या हंगामात सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेत सौराष्ट्रकडून रेल्वेविरुद्ध खेळताना ६१ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १०० धावा केल्या होत्या.
आयपीएलमधील पुजाराची कामगिरी
पुजाराने २०१० साली आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने पदार्पणात १६ चेंडूत १० धावा केल्या होत्या. त्यानंतर पुजाराने किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेही प्रतिनिधित्व केले. पण त्याला मोठी छाप पाडण्यात अपयश आले. त्यामुळे २०१४ नंतर त्याला कोणत्याही संघाने पसंती दाखवली नव्हती. त्याने २०१४ साली शेवटची आयपीएल स्पर्धा खेळली होती.
पण अखेर पुजाराला यंदाच्या आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने ५० लाखांची बोली लावत संघात घेतले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आयपीएल लिलावात सहभाग घेत असलेल्या चेतेश्वर पुजाराला ७ वर्षांनंतर आयपीएल खेळण्याची संधी मिळणार आहे. पुजाराने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत खेळताना ३० सामन्यांत ३९० धावा केल्या आहेत. तसेच यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
पुजाराची टी२० क्रिकेटमधील एकूण कामगिरी
पुजाराने टी२० क्रिकेटमध्ये एकूण ६४ सामने खेळले आहेत. यात त्याने २९.४७ च्या सरासरीने १ शतक आणि ७ अर्धशतकांसह १३५६ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये बीसीसीआय आणि खेळाडूंची होती इतक्या कोटींची कमाई; पाहून बसेल आश्चर्याचा धक्का
काय सांगता! आता दुकानांमध्ये विकेले जाणार धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ प्रेरित चॉकलेट
सचिन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये आहे ‘हे’ मोठे साम्य, रिकी पाँटिंगने केला दावा