येत्या 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. मात्र आता त्याला या दौऱ्यासाठी एक नवी जबाबदारी मिळाली आहे. ही जबाबदारी खूप खास आहे.
वास्तविक, चेतेश्वर पुजाराला बॉर्डर-गावस्कर मालिकेत कमेंटेटरची भूमिका मिळाली आहे. तो या मालिकेत स्टार स्पोर्ट्साठी हिंदीमध्ये कमेंट्री करताना दिसेल. ऑस्ट्रेलियाच्या चॅनल 7 ने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही घोषणा केली. चॅनेल 7 स्टार स्पोर्ट्सह बॉर्डर-गावस्कर मालिकेचे अधिकृत प्रसारक आहेत.
गेल्या काही काळापासून बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चेतेश्वर पुजाराची भूमिका आधुनिक काळातील राहुल द्रविडसारखीच राहिली आहे. त्याचं तंत्र, संयम आणि गोलंदाजांचा सामना करण्याची क्षमता यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 2018/19 मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी चेतेश्वर पुजारानं मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता. तेव्हा त्यानं चार सामन्यांच्या मालिकेत 521 धावा ठोकल्या होत्या, ज्यात तीन शतकांचा समावेश आहे. पुजारानं 2020-21 मध्येही चांगली कामगिरी केली होती. तेव्हा त्यानं मालिकेत 271 धावा केल्या होत्या, ज्यामुळे संघ सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला.
ऑस्ट्रेलियानं 2014-15 पासून बॉर्डर गावस्कर मालिका जिंकलेली नाही. यंदा कांगारुंना हा रेकॉर्ड मोडायचा आहे. तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या दृष्टीनं भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. भारताला WTC फायलनमध्ये थेट प्रवेश करायचा असेल, तर मालिकेतील कमीत कमी 4 सामने जिंकावे लागतील. त्यामुळे ही मालिका अत्यंत रोमांचक होऊ शकते.
गेल्या दोन मालिका विजयांचा हिरो असलेल्या चेतेश्वर पुजाराला यावेळी भारतीय संघात संधी मिळालेली नाही. त्यानंतर तो आता समालोचनाकडे वळाला आहे. तो आता मैदानावर नाही, तर कमेंट्री माईकवर आपला जलवा दाखवताना दिसेल.
हेही वाचा –
“गौतम गंभीर रडारवर आहे, ऑस्ट्रेलियात अपयशी ठरला तर….”; माजी सहकाऱ्याचं सूचक वक्तव्य
ओमानच्या खेळाडूने विश्वविक्रम केला! टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच
BGT; “घरच्या मैदानावर फलंदाजी करणे कठीण…” ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे मोठे वक्तव्य!