टी२० मालिकेत न्यूझीलंड संघाला धूळ चारल्यानंतर आता भारतीय संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत.या मालिकेतील पहिला सामना २५ नोव्हेंबर रोजी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडणार आहे. ही मालिका काही खेळाडूंसाठी संघात स्थान टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणार आहे, ज्यामध्ये अजिंक्य रहाणेचा देखील समावेश आहे. दरम्यान पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी चेतेश्वर पुजाराने अजिंक्य रहाणेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाच्या मध्यक्रमातील सर्वोत्तम फलंदाज आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून तो मोठी खेळी करण्यास अपयशी ठरत आहे. त्याने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शतक झळकावले होते, तर यावर्षी त्याला केवळ २ अर्धशतक झळकवण्यात यश आले आहे. त्याने या वर्षी १९ डावात १९.५८ च्या सरासरीने ३७२ धावा केल्या आहेत.
पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या वर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना चेतेश्वर पुजारा रहाणेबद्दल म्हणाला की, “तो एक अद्भुत खेळाडू आहे. खेळाडूंसोबत अनेकदा असे होत असते जेव्हा त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. हा खेळातील एक भाग आहे. चढ-उतार तर येणारच. मला वाटते की, तो आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला खेळाडू आहे, जो आपल्या खेळावर भरपूर मेहनत घेत असतो. मला माहित आहे फक्त एक मोठी खेळी आणि तो फॉर्ममध्ये येईल.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “तो नेट्समध्ये भरपूर मेहनत करतोय. मी पाहिलं, तो ज्याप्रकारे मेहनत घेतोय त्यावरून तो चांगल्याच लयीत असल्याचे दिसून येत आहे. मी आशा करतो की, तो मालिकेत भरपूर धावा करेल.”
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेच्या हाती देण्यात आले आहे. तसेच चेतेश्वर पुजारा उपकर्णधार असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कानपूरचे मैदान गाजवण्यासाठी भारतीय संघाचा कसून सराव!! बीसीसीआयने शेअर केले फोटो
कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाज ठरले फ्लॉप, दक्षिण आफ्रिकेचे पहिल्या डावात वर्चस्व