आज पासून सुरु होणाऱ्या चायना ओपन सुपर सिरीज स्पर्धेतून भारताच्या स्टार बॅडमिंटनपटूंनी माघार घेतली आहे. यात किदांबी श्रीकांत, साई प्रणित यांचा समावेश आहे.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या किदांबी श्रीकांतने काही दिवसांपूर्वीच तो माघार घेत असल्याचे सांगितले होते आता यात आणखी खेळाडूंची भर पडली आहे. भारताचे साई प्रणित, पारुपल्ली कश्यप, समीर वर्मा आणि अजय जयराम हे खेळाडू देखील स्पर्धेतून माघार घेत आहेत.
भारताच्या या बॅडमिंटनपटूंनी माघार घेतल्याने आता एच एस प्रणॉय आणि सौरभ वर्मा हे दोनच खेळाडू भारताच्या पुरुष एकेरी गटातून या स्पर्धेत उतरतील.
या खेळाडूंच्या माघारीला दुखापत हे मुख्य कारण आहे. समीरला खांद्याची दुखापत झाली होती तर जयरामने गुडघ्याच्या दुखापतीमुळे चायना ओपनबरोबरच २१ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या हाँग काँग ओपन सुपर सिरीज मधूनही माघार घेतली आहे.
याबरोबरच भारताची मिश्र दुहेरीचे जोडी प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी हे देखील या स्पर्धेत सहभागी होणार नाही. प्रणवला राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान पायाची दुखापत झाली होती. महिला दुहेरीत मात्र सिक्की रेड्डी अश्विनी पोनप्पाच्या साथीने सहभागी होईल.
या माघारीमुळे साई प्रणितच्या दुबईत होणाऱ्या वर्ल्ड सुपर सिरीज फायनलमध्ये सहभागी होण्याच्या अशा धूसर होणार आहेत. सध्या तो जागतिक क्रमवारीत १४ व्या स्थानी आहे.