वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका संघात मार्च महिन्याच्या सुरुवातीला ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. या मालिकेद्वारे वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. ४१ वर्षीय गेलची श्रीलंकाविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात निवड झाली आहे. मार्च २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने शेवटचा टी२० सामना खेळला होता.
या टी२० मालिकेत कायरन पोलार्ड वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्त्व करताना दिसेल. तर निकोलस पूरन हा संघाच्या उप-कर्णधारपदी आहे. ‘युनिव्हर्स बॉस’ गेलव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्स याचेही टी२० संघात पुनरागमन झाले आहे. या ३९ वर्षीय खेळाडूने २०१२ साली अखेरचा टी२० सामना खेळला होता.
यासंदर्भात वेस्ट इंडिजचे मुख्य निवडकर्ता रॉजर हॉपर यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “येत्या टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने सर्व संघ तयारीला लागले आहेत. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आम्ही आमचा सर्वोत्कृष्ट संघ निवडला आहे. गेलने टी२० संघातून बाहेर झाल्यानंतर इतर टी२० लीगमध्ये दमदार प्रदर्शन केले आहे. त्यामुळे आम्ही त्याला पुन्हा संघात जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.”
टी२० मालिकेसाठी पाहुणा श्रीलंका संघ वेस्ट इंडिजमध्ये पोहोचला आहे. ३ मार्चपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. एक दिवसआड म्हणजे ५ मार्च आणि ७ मार्च रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा टी२० सामना होईल. हे तिन्ही सामने अँटिगामधील कूलिज क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येतील.
वेस्ट इंडीजचा टी-२० संघ:
कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उप-कर्णधार), फेबियन ऍलेन, ड्वेन ब्रावो, फिडेल एडवर्ड्स, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, जेसन होल्डर, अकील होसिन, एविन लुईस, ओबेद मॅककॉय, रोवमन पॉवेल, लेंडल सीमन्स, केविन सिनक्लेयर
महत्त्वाच्या बातम्या-
एका वर्षापुर्वी भारतीय संघातील स्थान नव्हते पक्के, आज तोच बनलाय सर्वात मोठा ‘मॅच विनर’
आयसीसी आणि बीसीसीआयमध्ये पुन्हा बिनसलं, पाहा काय आहे यामागचं कारण