इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा हंगाम शेवटाकडे चालला आहे. साखळी फेरीतील ५२ सामने पार पडले असून हळूहळू प्लेऑफचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. अशात आयपीएलमधून मोठी बातमी पुढे येत आहे. आयपीएलचे कित्येक हंगाम गाजवणारा वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने त्याच्या पुनरागमनाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो द मिरर या वृत्तपत्राशी बोलत होता.
गेल (Chris Gayle) आयपीएल २०२२ मध्ये सहभागी झाला नाहीये. त्याने स्वत: मेगा लिलावात आपले नाव न नोंदवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता गेलने स्वत आपल्या पुनरागमनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. पुढील वर्षी मी परत येतोय, त्यांना माझी गरज आहे, असे म्हणत गेल आपल्या आयपीएलमधील पुनरागमनाबद्दल (Chris Gayle On IPL Comeback) बोलला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
“मी आयपीएलमध्ये २ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्त्व केले आहे. कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज अशी त्यांची नावे आहेत. बेंगलोर आणि पंजाब संघांपैकी एका संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून द्यायला मला आवडेल. बेंगलोर संघासोबत माझा चांगला कार्यकाळ होता, जिथे मी आयपीएलमध्ये अधिक यशस्वी झालो. तर पंजाब संघासोबतचा काळही फार चांगला होता. मला नवनव्या गोष्टी करायला आवडतात. तसेच आव्हानांना सामोरे जायलाही मला आवडते. बघू पुढे काय होते?,” असे गेल म्हणाला.
दरम्यान गेलने आयपीएलमध्ये बेंगलोर, पंजाब आणि कोलकाता संघांचे प्रतिनिधित्व करताना त्याने एकूण १४२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३९.७२च्या सरासरीने ४९६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान २०११ ते २०१७ या काळात तो बेंगलोर संघात होता. बेंगलोरकडून त्याने ८५ सामने खेळताना ४३च्या सरासरीने ३१६३ धावा केल्या आहेत.
मात्र २०१८ सालच्या लिलावात गेल अनसोल्ड राहिल अशी स्थिती उद्भवली होती. परंतु पंजाब संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि मूळ किंमतीत विकत घेतले. गेलने पंजाबकडून २ हंगाम ४१ सामने खेळताना १३३९ धावा केल्या आहेत. तर कोलकाताकडून तो सर्वात कमी सामने खेळला आहे. त्याने १६ सामने खेळताना ४६३ धावा केल्या आहेत.
अशात आता खरच गेल आयपीएल २०२३ मध्ये पुनरागमन करतो का आणि त्याचे पुनरागमन झाले तर त्याला कोणती फ्रँचायझी संधी देते, हे पाहाणे रोमांचक ठरेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-