पुणे। पिछाडी भरून काढत ब्ल्यूस्टॅगने अव्वल गटातील रुपाली एससी संघाचा ५-१ असा पराभव करून पहिलव्या सिटी करंडक २०२१ बाद फेरी स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली. ही स्पर्धा पुण्यातील मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे सुरू आहे.
पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (पीडीएफए) सहाय्याने या स्पर्धेचे आयोजन सिटी एफसी, पुणे संघाने केले आहे.
रुपाली एससी संगाने ७व्या मिनिटालाच आघाडी घेतली. त्यांच्या शुभम पोटघन याने हा गोल केला. त्यानंतर ब्ल्यूस्टॅग एसए संघाने २०व्या मिनिटाला बरोबरी साधली. त्यावेळी प्रशांत थोरातने २७व्या मिनिटाला जाळीचा अचूक वेध घेतला. बरोबरीनंतर ब्ल्यूस्टॅगचा खेळ अधिक आक्रमक झाला. त्यांनी ३०व्या मिनिटाला गोल करून २-१ अशी आघाडी घेतली. मध्यंतराला त्यांनी २-१ अशी आघाडी राखली होती. उत्तरार्धात त्यांच्या आक्रमणाची धार अधिक वाढली. सामन्याच्या ४५व्या मिनिटाला तन्मय बर्वे, ५१व्या मिनिटाला अनिकेत गेन, ५८व्या मिनिटाला विजय सायालु यांनी गोल करून धक्कादायक निकालाची नोंद केली.
दुसऱ्या सामन्यात आयफा (एआयवायएफए) संघाने एबीसी एफसी संघावर ६-० असा दणदणीत विजय मिळविला. हृतिक पाटिल याने २४ आणि २८व्या मिनिटाला दोन गोल केले. हिमांशु चव्हाण (१३वे), राज मोरे (१८वे), घनश्याम पी (२८वे), सॅम्युएल सेल्वादास (५०वे) यांनी गोल करून संघाचा मोठा विजय साकार करण्यात आपला वाटा उचलला.
निकाल –
ब्ल्यूस्टॅग एस.ए. ५ (प्रशांत थोरकात २७वे, सिचन चांडेल ३०वे, तन्मय बर्वे ४५वे, अनिकेत गेन ५१वे, विजय सायालू ५८वे मिनिट) वि.वि. रुपाली एससी १ (शुभम पोटघन ७वे मिनिट)
आयफा (एआयवायएफए) ६ (हिमांशु चव्हाण १३वे, राज मोरे १८वे,. हृतिक पाटिल २४, ४८वे, घनश्याम पटेल २८वे, सॅम्युएल सेल्वादास ५०वे मिनिट) वि.वि. एबीसी एफसी ०






