---Advertisement---

सिटी कप २०२१: डायनामाईट, स्निग्मयसह जाएंटस उपांत्यपूर्व फेरीत

On: गुरूवार, नोव्हेंबर 18, 2021 9:36 AM
---Advertisement---

पुणे। डायनामाईटस, स्निग्मय आणि जाएंटस यांनी सिटी कप २०२१ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्युपूर्व फेरीत प्रवेश केला. डायनामाईटसला विजयासाठी झगडावे लागले, तर स्निग्मय आणि जाएंटस संघांनी एकतर्फी विजयासह आपली आगेकूच कायम राखली.

पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने सिटी एफसी पुणे संघाने या स्पर्धेचे आयोजन केले असून, सामने त्यांच्याच मोशी येथील सिटी स्पोर्टंस अरेनावर सुरू आहेत.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात डायनामाईटस संघाने खडकी ब्ल्यूज संघाचा १-० असा पराभव केला. हा एकमात्र गोल अनिकेत भार्साखले याने ५८व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी किकवर केला. उत्तरार्धात खडकी ब्ल्यूज संघाच्या प्रविण गवळी याच्या चुकी पर्यंत सामना चुरशीने खेळला जात होता. त्याच्या चुकीचा खडकी ब्ल्यूजला फटका बसला. पंचांनी डायनामाईटसला पेनल्टी किक दिली ती संधी त्यांनी दवडली नाही.

दुसऱ्या सामन्यात स्निग्मय एफ.सी. संघाने नवा महाराष्ट्रावर ४-१ असा मोठा विजय मिळविला. सामन्याला वेगवान सुरवात झाली. दुसऱ्याच मिनिटाला संग्राम पाटिलने स्निग्मयला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सुबोध लामाच्या सहा मिनिटातील दोन गोलने सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूला झुकवला. त्याने १०व्या आणि १६व्या मिनिटाला गोल केले. पूर्वार्धातच १९व्या मिनिटाला वैभव वोडोबे याने नवा महाराष्ट्रसाठी एक गोल केला. मध्यंतराला स्निग्मय संघाने ३-१ अशी आघाडी मिळविली होती. उत्तरार्धात सुमित भंडारीने ४३व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी भक्कम केली.

जाएंटस एफसी संघाने निर्विवाद वर्चस्व राखताना पुणेरी वॉरियर्सचा २-० असा पराभव केला. पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत राहिल्यावर उत्तरार्धात ५१व्या मिनिटाला अंशुल शर्मा आणि ५६व्या मिनिटाला स्मितेश पवारने गोल केला. उत्तरार्धात जाएंटसचा खेळ अधिक सरस झाला.

निकाल –
स्निग्मय एफसी ४ (संग्राम पाटिल २रे, सुबोध लामा १०वे, १६वे, सुमित भंडारी ४३वे मिनिट) वि.वि. नव महाराष्ट्र १ (वैभव वोडोबे १९वे मिनिट)
जाएंटस २ (अंशुल शर्मा ५१वे, स्मितेश पवार ५६) वि.वि. पुणेरी वॉरियर्स एफसी ०
डायनामाईटस एस. सी. १ (अनिकेत भार्साखले ५८वे) वि.वि. खडकी ब्ल्यूज एफ. सी. ०

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---