पुणे। कमालीच्या वर्चस्वाने खेळताना जीओजी एफसीसी संघाने सिटी एफसी पुणे संघाने आयोजित केलेल्या सिटी कप २०२१ फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे रविवारी झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी स्निग्मय एफ.सी. संघावर एकतर्फी लढतीत ४-० असा विजय मिळविला.
स्निग्मय एफ. सी. संघाने सुरवात चांगली केली होती. त्यांच्या खेळात एक प्रकारचा वेग आणि लय होती. पण, निर्माण केलेल्या संधीवर ते गोल करण्यात अपयशी ठरले. दुसरीकडे जीओजीच्या खेळात जबरदस्त समन्वय होता. ते विजयाच्या इराद्यानेच मैदानात उतरले होते. त्यांनी खेळावर कमालीचे वर्चस्व राखले. सामन्याच्या १७व्या मिनिटाला त्यांचे खाते उघडले. स्निग्मय एफसी संघाचा गोलरक्षक शंकर कदम याने कॉर्नर किक परतवून लावली. पण, ती क्लिअर करण्याच्या नादात ऍशले दास याने चेंडू आपल्याच जाळीत मारला. स्वयं गोलने जीओजीचे खाते उघडले. जीओजीला मध्यंतराला या एकमात्र गोल आघाडीवरच समाधान मानावे लागले.
उत्तरार्धात सामन्याच्या ४८व्या मिनिटाला श्रीकांत मोलनगिरी याने दुसरा गोल केला. आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून घेत त्याने गोलरक्षकाला चकवले. त्यानंतर सामना एकतर्फी झाला. दडपणाखाली स्निग्मयच्या बचावफळीकडून चुका झाल्या. त्याचा फायदा उचलत सुरज थापा याने ७९नव्या मिनिटाला संघाचा तिसरा गोल केला. अखेरच्या टप्प्यात ८२व्या मिनिटाला विकी राजपूत याने चौथा गोल करून आघाडी भक्कम केली आणि यात आघाडीवर त्यांनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
विजेतेपदासाठी जीओजी एफसीसी संघाला रोख ५० हजार रुपयाचे पारितोषिक मिळाले. उपविजेता स्निग्मयएफसी संघाला २५ हजार रुपयाचे पारितोषिक मिळाले. पारितोषिक वितरण उत्तर प्रदेशातील देवरिया विधानसभेचे आमदार सुरेश तिवारी यांच्या हस्ते पार पडले. या वेळी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, सिटी एफ.सी. पुणेचे अध्यक्ष शशांक कर्णिक, नकलबॉल स्पोर्टस एलएलपीचे संचालक आशिष पांडे उपस्थित होते.
निकाल –
जीओजी एफसीसी ४ (ऍशले दास १७नवे मिनिट स्वयं गोल, श्रीकांत मोलनगिरी ४८वे मिनिट, सुरज थापा ७९वे मिनिट, विकी राजपूत ८२वे मिनिट) वि.वि. स्निग्मय एफसी ०
वैयक्तिक पारितोषिके –
सामन्याचा मानकरी – श्रीकांत मोलनगिरी (जीओजी एफसीसी)
सर्वाधिक गोल – कार्तिक राजू (५) (जीओजी एफसीसी)
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – सुरेश पिल्लई (जीओजी एफसीसी)
लक्षवेधी खेळाडू – सुमित भंडारी (स्निग्मय एफसी)