पुणे। प्रथम श्रेणीत खेळणाऱ्या गनर्स संघाने सिटी कप २०२१ स्पर्धेत सनसनाटी निकाल नोंदवताना अव्वल श्रेणीातील परशुरामियन्स एफसी संघाचा पराभव केला. त्याचबरोबर गेम ऑफ गोल एफसीसी (जीओजी) आणि केपी इलेव्हन संघांनी विजय मिळवून आपली आगेकूच कायम राखली. सिटी कप २०२१ ही बाद फेरीची स्पर्धा पु्ण्यातील मोशी येथील सिटी स्पोर्ट्स अरेना येथे सुरू आहे.
पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने सिटी एफ.सी. पुणे संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
गनर्स संघाने उत्तरार्धात जयंत निंबाळकरने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर परशुरामियन्स एफसी संघाचा ५-२ असा पराभव केला. अर्थात, सामन्याचा पहिला गोल परशुरामियन्सच्या सॅमसन जोसेफ याने १०व्या मिनिटाला केला. त्यानंतर २१व्या मिनिटाला हर्षल वाळवेकर याने गनर्सला बरोबरी राखून दिली. अझिम मुल्लाने लगोलग २६व्या मिनिटाला गोल करून गनर्सला आघाडी मिळवून दिली. ऍलन राघवेंद्र (३०वे) याने आणखी एक गोल करून गनर्सची आघाडी भक्कम केली. पुर्वार्धाच्या अखेरच्या मिनिटाला यासिर खानने ३५व्या मिनिटाला गोल करून परशुरामियन्सच्या बरोबरीच्या आशा पल्लवित केल्या. विश्रांतीला गोलफलक ३-२ असा होता. उत्तरार्धात मात्र जयंतच्या दोन गोलने गनर्सने विजय निश्चित केला.
केपी इलेव्हन संघाने यजमान सिटी एफ. सी. पुणे संघांच्या आशांना सुरुंग लावला. दोन्ही सत्रात एकेक गोल करताना केपी इलेव्हन संघाने २-० असा विजय मिळविला. एडिवने फालेरो याने २०व्या मिनिटाला, तर उत्तरार्धात अल्फ्रेड नेगल याने ४९व्या मिनिटाला दुसरा गोल केला.
तिसऱ्या सामन्यात जीओजी एफसीसी संघाने पिंपरीच्या राहुल एफसी संघाचा ३-१ असा पराभव केला. आक्रमक प्रकाश थोरातने १५व्या मिनिटाला जीओजीसाठी पहिला गोल केला. त्यानंतर कार्तिक राजूनो ४५ आणि ५२व्या मिनिटाला दोन गोल केले. या दरम्यान राहुल एफसी साठी नईम सय्यद याने ४८व्या मिनिटाला गोल केला.
निकाल –
गेम ऑफ गोल (जीओजी) एफसीसी ३ (प्रकाश थोरात १५वे, कार्तिक राजू ४५वे, ५२वे मिनिट) वि.वि. राहुल एफसी – १ (नईम सय्यद ४८वे मिनिट)
केपी इलेव्हन २ (एडविन फालेरो २०वे, अल्फ्रेड नेगल ४९वे मिनिट) वि.वि. सिटी एफ सी पुणे ०
गनरस् -५ (हर्षल वाळवेकर २१वे,. अझिम मुल्ला २६वे, अॅलन राघवेंद्र ३०वे, जयंत निंबाळकर ४५वे, ६१वे मिनिट) वि.वि. परशुरामियन्स एफसी ३ (सॅमसन जोसेफ १०वे, यासिर खान ३५वे मिनिट)