बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएल 2026 चे सामने होणार की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे. आयपीएल 2025 चे जेतेपद आरसीबीने (RCB) जिंकल्यानंतर आयोजित केलेल्या ‘व्हिक्ट्री परेड’ दरम्यान स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर या मैदानावर एकही मोठा सामना झालेला नाही. दरम्यान, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी आरसीबीने स्टेडियममध्ये AI-सक्षम (Artificial Intelligence) कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला (KSCA) लिहिलेल्या पत्रात आरसीबीने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 300 ते 350 AI कॅमेरे लावण्याची सूचना केली आहे. या अत्याधुनिक कॅमेऱ्यांमुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे, रांगांचे व्यवस्थापन करणे आणि बाहेर जाण्याच्या मार्गांवर बारीक नजर ठेवणे सोपे होईल. मोठ्या स्पर्धांचे आयोजन सुरक्षितपणे पार पडावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
आरसीबीचा हा प्रस्ताव अशा वेळी आला आहे, जेव्हा काही रिपोर्ट्सनुसार आयपीएल 2026 मधील आरसीबीचे घरगुती (Home) सामने पुण्यात हलवले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (MCA) स्पष्ट केले आहे की, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बंगळुरू आणि राजस्थानच्या टीमनी पुणे स्टेडियमची पाहणी केली होती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझीने म्हटले आहे की, हे AI कॅमेरे लावण्याचा पूर्ण खर्च सुमारे 4.5 कोटी रुपये ते स्वतः उचलतील. आयपीएल 2026 मध्ये आरसीबीचे सामने नेमके कुठे होतील, हे अद्याप निश्चित झालेले नाही. जर चिन्नास्वामी स्टेडियमला परवानगी मिळाली नाही, तर आरसीबीला त्यांचे होम सामने इतर शहरांत खेळवावे लागतील.






