---Advertisement---

पाकिस्तानला टीम इंडियाविरुद्ध खेळावाच लागणार? नेदरलँडमुळे सुपर 8 फेरीचं गणित बिघडलं

On: शनिवार, फेब्रुवारी 7, 2026 6:42 PM
---Advertisement---

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत पाकिस्तान सामना होणार की नाही, यावर सध्या मोठं प्रश्नचिन्ह आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सवर 3 विकेट्सनी (3 चेंडू शिल्लक ठेवून) विजय मिळवला असला, तरी हा विजय पाकिस्तानसाठी दिलासादायक ठरण्याऐवजी डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे. कारण दोन गुण मिळाले असले तरी नेट रनरेट फारसा प्रभावी राहिलेला नाही.

सध्या पाकिस्तानच्या खात्यात 2 गुण असून नेट रनरेट +0.240 आहे. अशा परिस्थितीत पुढील एखादा सामना गमावला, तर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे भारताविरुद्धचा सामना टाळण्याचा निर्णय पाकिस्तानसाठी महागात पडू शकतो. अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून, त्या निकालावर भारताशी खेळायचं की नाही, याचं चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात श्रीलंका क्रिकेट बोर्ड थेट मैदानात उतरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) अधिकृत विनंती केली आहे की 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणारा भारत-पाकिस्तान सामना खेळवावा. या संदर्भात एसएलसीने (SLC) पीसीबीला ई-मेल पाठवून स्पष्ट केलं आहे की सामना रद्द झाला, तर श्रीलंका क्रिकेटला मोठा आर्थिक फटका बसेल. गेट मनी, हॉस्पिटॅलिटी विक्री, प्रसारण हक्क आणि यजमानपदाशी संबंधित उत्पन्नावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

याच पार्श्वभूमीवर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी थेट पीसीबी चेअरमन मोहसिन नक्वी यांच्याशी संपर्क साधत सकारात्मक भूमिकेची मागणी केली आहे. रिपोर्टनुसार, मोहसिन नक्वी यांनीही या विनंतीला अनुकूल प्रतिसाद देत, “पाकिस्तान सरकारशी चर्चा करून अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल,” असं सांगितलं आहे. हा विषय थेट पंतप्रधानांसमोर मांडण्यात येणार असून, सोमवारपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारताचा संघ 15 फेब्रुवारीच्या सामन्यासाठी कोलंबोला जाणार, याबाबत कोणतीही शंका नाही. मात्र पाकिस्तानने मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला, तर भारताला नियमानुसार दोन गुण मिळतील. त्यामुळे आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष एकाच प्रश्नावर केंद्रित झालं आहे. भारत-पाकिस्तान सामना रंगणार की गुणतालिकेतच निकाल लागणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---