टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर बक्षिसाचा वर्षाव सुरूच आहे. आधी बीसीसीआयनं संपूर्ण संघाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनं देखील टीम इंडियाला बक्षिसाची घोषणा केली आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकार विश्वचषक जिंकणाऱ्या राज्यातील 4 खेळाडूंना देखील बक्षीस जाहीर केलं आहे.
वास्तविक, टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे 4 महाराष्ट्राचे खेळाडू होते. गुरुवारी (5 जुलै) या 4 खेळाडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधान भवनात सत्कार करण्यात आला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या खेळाडूंना बक्षिसाची घोषणा केली.
मुख्यमंत्र्यांनी भारतीय संघाला 11 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. याशिवाय भारतीय संघातील या चारही खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपयांच्या धनादेशाची घोषणा करण्यात आली आहे. या खेळाडूंशिवाय मुख्यमंत्र्यांनी संघातील सहयोगी सदस्य पारस म्हाम्ब्रे आणि अरुण कनाडे यांच्या योगदानाची देखील दखल घेतली.
यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मराठीत भाषणं केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. बुधवारी सायंकाळी मुंबईत भारतीय संघासाठी विजय परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. या विजय परेडला लाखोंच्या संख्येनं चाहते जमले होते. विजय परेडनंतर सर्व खेळाडूंचा वानखेडे स्टेडियमवर सत्कार करण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या या खेळाडूंचा विधानभवनात सत्कार झाला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “विधान भवनात अशाप्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन कधीच करण्यात आलं नव्हतं. एवढ्या वर्षानंतर भारताचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. हा संपूर्ण संघाच्या प्रयत्नांचा विजय आहे.”. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोहित शर्माची प्रशंसा करताना म्हणाले, “रोहितनं टी20 विश्वचषक जिंकला, मात्र त्यानं टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याचं नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईत बनणार नवं क्रिकेट स्टेडियम, वानखेडे पेक्षा चारपट असेल आसन क्षमता!
कचऱ्याची गाडी पाहून लगावले पाकिस्तान पाकिस्तानचे नारे! भारताच्या विजयी रॅलीतला हा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
टीम इंडियाचे नवे पर्व सुरु, भारतविरुद्ध झिम्बाब्वे टी20 मालिकेला आजपासून सुरुवात