आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे (ICC womens world cup final INDW vs SAW). या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. याच सामन्यात प्रतिका रावलच्या (Pratika Raval) जागी इंजरी रिप्लेसमेंट म्हणून आलेली शेफाली वर्माने (Shefali Verma) अप्रतिम फलंदाजी करत सगळ्यांचे मन जिंकले. आपल्या वनडे करिअरमधील ही सर्वात मोठी खेळी शेफालीने आज या फायनलमध्ये केली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात फील्डिंग करताना भारताची सलामी फलंदाज प्रतिका रावल जखमी झाली. त्यामुळे ती संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली. तिच्या आधीच्या सामन्यात, न्यूझीलंडविरुद्ध तिने शतक ठोकले होते. त्यामुळे तिचं बाहेर जाणं हे टीमसाठी मोठं नुकसान मानलं जात होतं.
त्या जागी, बराच काळ संघाबाहेर असलेली तरुण खेळाडू शेफाली वर्माला पुन्हा संघात स्थान मिळालं. पण तिच्यावर पहिल्याच संधीपासून चांगली कामगिरी करण्याचा दबाव होता. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने फक्त 5 चेंडूंमध्ये 10 धावा केल्या, त्यामुळे काही चाहत्यांनी तिच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण फायनलमध्ये शेफालीने आपल्या बॅटनेच सर्व टीकाकारांना उत्तर दिलं.
टॉस गमावल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली. शेफालीने अवघ्या 78 चेंडूंमध्ये 111.54 च्या स्ट्राईक रेटने 87 धावांची जबरदस्त खेळी साकारली. तिच्या खेळीत 7 चौकार आणि 2 जबरदस्त षटकार होते. तिच्या साथीला स्मृती मंधानानेही 45 धावांची चांगली खेळी केली.






