भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) यांचे बुधवारी (31 जुलै) रात्री निधन झाले. 71 वर्षीय गायकवाड हे दीर्घ काळापासून ब्लड कॅन्सरनं त्रस्त होते. गायकवाड यांची अवस्था पाहून विश्वविजेता कर्णधार कपिल देव (Kapil Dev) मदतीसाठी पुढे आला. त्यांनी इतरांनाही मदतीचे आवाहन केले. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) अंशुमन गायकवाडच्या उपचारासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यांच्यावर इंग्लंडमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.
अंशुमन गायकवाडच्या (Anshuman Gaekwad) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्ल बोलायचं झालं तर, त्यानं भारतासाठी 40 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 30.07च्या सरासरीनं 1985 धावा केल्या. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 10 अर्धशतक, 2 शतक आणि 1 द्विशतक आहे. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 201 राहिली. जी त्यानं पाकिस्तानविरुद्ध केली होती. गायकवाडनं सप्टेंबर 1983 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 201 धावांची खेळी केली होती. सप्टेंबर 1983मध्ये झालेल्या जालंधर कसोटी सामन्यात गायकवाडनं 671 मिनिटे फलंदाजी करुन पाकिस्तानी गोलंदाजांना अडचणीत आणले होते. या सामन्यात त्यानं 436 चेंडूत 17 चौकारांसह 201 धावा केल्या होत्या.
गायकवाडनं भारतासाठी 15 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यामध्ये त्यानं 14 डावात 20.69च्या सरासरीनं 269 धावा केल्या. यादरम्यानं त्याचा स्ट्राईक रेट 52.84 राहिला. एकदिवसीय त्याच्या नावावर 1 अर्धशतक आहे, तर सर्वोच्च धावसंख्या नाबाद 78 आहे.
अनिल कुंबळेनं (Anil Kumble) 1999मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटलामध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी डावात 10 विकेट घेतल्या तेव्हा अंशुमन गायकवाड संघाचे प्रशिक्षक होते. सलामीचा फलंदाज अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) त्याच्या बचावात्मक कौशल्यासाठी प्रसिद्ध होता. 1974 ते 1984 दरम्यान, चेतन चौहान आणि गायकवाड यांच्यामध्ये भारतीय संघात सुनील गावसकरचा जोडीदार म्हणून दुसऱ्या सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेसाठी स्पर्धा होत होती.
महत्त्वाच्या बातम्या-
निवृत्ती नाही, मला तर विश्रांती घेतल्यासारखं वाटतंय’, रोहितचा मोठा खुलासा
एकच चर्चा- ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या स्वप्निलने कोणती अंगठी घातली होती हातात?
मराठमोळ्या स्वप्निल कुसाळेचं जगभर काैतुक, पंतप्रधान मोदींची कांस्य पदक विजेत्यासाठी खास पोस्ट