श्रीलंकेविरुद्ध झालेल्या आशिया चषक 2022 मधील तिसऱ्या सुपर 4 सामन्यात भारतीय संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही खास प्रदर्शन करता आले नाही. कर्णधार रोहित शर्मा याला वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. या सामन्यादरम्यान भारताच्या फलंदाजी क्रमवारीत काही बदलही केले गेले. केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या झटपट विकेट्स गेल्यानंतर पाचव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या आणि सहाव्या क्रमांकावर रिषभ पंत याला फलंदाजीला पाठवले गेले. मात्र फलंदाजीला जातेवेळी दोघांमध्ये थोडे कंफ्यूजन झाल्याचे पाहायला मिळाले. हा प्रसंग कॅमेरात कैद झाला आहे.
सोशल मीडियावर पंत (Rishabh Pant) आणि हार्दिकमधील (Hardik Pant) या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसते की, पंत आणि हार्दिक दोघे एकाच जागी बसलेले आहेत. दोघेही भारतीय संघाची निळी जर्सी घालून बसलेले आहेत. तसेच त्यांच्यापुढील टेबलवर ग्लोव्ह्स आणि हेल्मेट ठेवलेले होते. थोडक्यात ते दोघेही फलंदाजीसाठी तयार बसले होते.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पंतला पाचव्या क्रमांकावर व हार्दिकला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले होते. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी क्रमवारीत बदल केला गेला. सूर्यकुमार यादव 34 धावांवर बाद होऊन माघारी परतल्यानंतर डगआऊटमध्ये बसेलेल पंत आणि हार्दिक कर्णधाराकडे असमंजसपणे पाहताना दिसले. दोघांनाही प्रश्न पडला होता की, आता फलंदाजीला कोण जाणार आहे.
शेवटी हार्दिकला सांगण्यात आले की, तो सूर्यकुमारनंतर फलंदाजीला जाणार आहे. यावेळी मागे थांबलेला पंत मात्र निराश झाला आणि शांतपणे खुर्चीवर बसून राहिला. पंतची ही प्रतिक्रिया कॅमेरात कैद झाली आहे.
https://twitter.com/saqlain692022/status/1567185772310044673?s=20&t=ur_TfhTEbwwK_FMEh9KdQA
दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 173 धावा फलकावर लावल्या. भारताकडून कर्णधार रोहितने एकाकी झुंज दिली. 41 चेंडू खेळताना त्याने 72 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 5 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव 34 धावा करू शकला. प्रत्युत्तरात सलामीवीर पथुम निसांका (52 धावा) आणि कुसल मेंडिस (57 धावा) यांच्या खेळींच्या जोरावर श्रीलंकेने 1 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या विजयासह श्रीलंकेने अंतिम सामन्यातील त्यांची जागा निश्चित केली आहे.






