रविवार रोजी (११ जुलै) कोपा अमेरिका २०२१ चा अंतिम सामना अर्जेंटिना विरुद्ध ब्राजील यांच्यात पार पडला. ही रोमांचक आणि अटीतटीची लढत ब्राजीलच्या रिओ डि जिनेरियो शहरातील मारकाना स्टेडियममध्ये झाली. दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने १-० ने ब्राजीलला पराभवाची धूळ चारत इतिहास रचला.
तब्बल २८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अर्जेंटिनाने ही ट्रॉफी पटकावली आहे. यापुर्वी १९९३ मध्ये त्यांनी कोपा अमेरिकेचा शेवटचा चषक जिंकला होता.
https://twitter.com/CopaAmerica/status/1414044807631093760?s=20
स्टार स्ट्राईकर मेस्सीच्या नेतृत्त्वाखाली अर्जेंटिना संघ २०१५ आणि २०१६ मध्ये कोपा अमेरिकेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र त्यांना विजय मिळवण्यात यश आले नाही. मात्र यावेळी संघ सहकारी एंजेल डि मारिया याने मेस्सीचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याने एकमात्र पण महत्त्वपुर्ण गोल करत संघाला जेतेपद मिळवून दिले आहे. मेस्सीने पहिल्यांदाच कोणती मोठी फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे.
https://twitter.com/CopaAmerica/status/1414018206717648900?s=20
मेस्सीच्या अर्जेंटिना आणि नेमारच्या ब्राजील संघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. सामन्याच्या २२ व्या मिनिटाला डि मारियाने गोल करत अर्जेंटिना संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर प्रतिस्पर्धी ब्राजीलने ताबडतोब आक्रमण केले. सामन्यादरम्यान ब्राजील संघाच्या खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. चेंडू ६० टक्के ब्राजीलच्या कोर्टात राहिला, मात्र त्यांच्या खेळाडूंना १३ शॉट मारुन एकही गोल करता आला नाही. याउलट मेस्सीने वैयक्तिक ४ गोल केले आणि इतर खेळाडूंना ५ गोल करण्यातही मदत केली.
उभय संघातील खेळाडूंनी एकमेकांवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सामन्यादरम्यान अर्जेटिंनाच्या ५ आणि ब्राजीलच्या ४ खेळाडूंना पिवळे कार्ड दाखवण्यात आले.





