---Advertisement---

ISL 2018:  नॉर्थईस्टविरुद्ध फॉर्म राखण्याचा जमशेदपूर एफसीचा निर्धार

---Advertisement---

 जमशेदपूर: जमशेदपूर एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध आज लढत होत आहे.

जेआरडी टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावरील या लढतीत फॉर्म कायम राखून पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच सुरु ठेवण्याचा जमशेदपूरचा निर्धार राहील.

स्टीव कॉप्पेल यांच्या मार्गदर्शनाखाली जमशेदपूरने गेल्या दोन सामन्यांत विजय मिळविताना केरळा ब्लास्टर्स आणि दिल्ली डायनॅमोज यांना हरविले आहे.

मागील तीन सामन्यांत ते प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळले. यात त्यांनी नऊ पैकी सहा गुण जिंकले. आता ते घरच्या मैदानावर परतले आहेत.

जमशेदपूरने संघटित खेळाच्या जोरावर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. बाद फेरीच्या दिशेने त्यांनी केलेली घोडदौड अनपेक्षित ठरली आहे, पण त्यांना गाफील राहून चालणार नाही.

याचे कारण मुंबई सिटी एफसी आणि एफसी गोवा यांच्यापेक्षा जमशेदपूरचे सामने जास्त झाले आहेत. जमशेदपूरला विजय अनिवार्य आहे. त्यांनी तीन गुण मिळविले तर गुणतक्त्यात त्यांच्यापेक्षा खाली असलेल्या संघांवर उरलेले सामने जिंकण्याचे दडपण येईल.

कॉप्पेल यांनी सांगितले की, घरच्या मैदानावरील चांगला फॉर्म कायम राखण्याची आम्हाला आशा आहे. आता प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल. आता तीन गुण जास्त महत्त्वाचे आहेत.

अखेरच्या काही आठवड्यांमध्ये प्रत्येक सामन्यात आम्हाला विजय अनिवार्य असेल. उद्या जिंकल्यास उत्तमच होईल, पण तसे झाले नाही तर आमच्या महत्त्वाकांक्षा संपलेल्या नसतील.

नॉर्थईस्टला गेल्या तीन सामन्यांत विजय मिळविता आलेला नाही. अॅव्रम ग्रँट यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. हे निकाल आपल्या बाजूने लागले नसले तरी कामगिरीत सुधारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले.

ग्रँट यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही फुटबॉलपटू असता तेव्हा परिस्थिती कशीही असली तरी तुम्हाला खेळ उंचावणे नेहमीच क्रमप्राप्त असते. आम्ही उद्या हेच करू. मागील सामन्यात पुणे सिटीकडून आम्ही एकमेव गोलने हरलो तरी संघाने झुंज चांगली दिली.

खेळाडू चांगले खेळत असल्याचे तुम्ही पाहू शकता. यापूर्वीच्या सामन्यांत काय घडले ते निराशाजनक होते. यानंतर निकाल काहीही लागले असले तरी आम्ही सामने जिंकण्याचा चांगला दृष्टिकोन प्रदर्शित केला.

ग्रँट यांच्यासमोर काही खेळाडूंच्या दुखापतींची समस्या आहे. कॉप्पेल यांनी सांगितले की, मोसमाच्या या टप्यात प्रत्येक संघासमोर अशी समस्या असेल, पण माझा संघ या लढतीसाठी शंभर टक्के तंदुरुस्त असण्याची आशा आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment