मुंबई । कोरोना वायरच्या प्रादुर्भावामुळे भारतीय संघातील खेळाडू हे आपल्या घरीच परिवाराबरोबर सुरक्षित राहण्यावर भर देत आहेत. दुसरीकडे एका युवा क्रिकेटपटूची आई जी कोरोनाच्या संकटात घराबाहेर पडून नोकरीवर आपले कर्तव्य बजावत आहे. वैदेही अंकोलेकर असे त्यांचे नाव आहे. त्या युवा क्रिकेटपटू अथर्व अंकोलेकर यांची आई आहेत.
वैदेही अंकोलेकर या मुंबईत बेस्टच्या बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करत आहेत. वैदेही प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, मी जर कामावर गेले नाहीत तर माझे पैसे कापले जातील. घरामध्ये कमविणारे कुणीच नसल्यामुळे मला नोकरीवर जावे लागते. माझा मुलगा अथर्व हा मला कामाला जाऊ नको असे सांगतो. पण कामाला गेले नाही तर कुटुंबाचे पालनपोषण करणे अवघड होईल.
वैदेही म्हणाल्या, मी अंधेरी आणि विरार मार्गावर काम करते. बेस्टची बस विरारपर्यंत जात नाही. मी कोरोना वॉरियर्स साठी इमर्जन्सी सर्व्हिस म्हणून काम करते. बीएमसीचे कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, आणि नर्स यांना वेळेत त्यांच्या कार्यालयात आणि हॉस्पिटलमध्ये पोचवण्याची जबाबदारी आमच्यावर असते. लोकल बंद असल्यामुळे लोक बसमध्ये प्रवास करत आहेत. मला गर्व आहे की, कोरोना व्हायरसच्या संकटाविरुद्ध लढताना मी माझे योगदान देत आहे.
अथर्वची आई मागील वर्षी बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून काम करत आहेत. त्यांनी सांगितले की, बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याने अथर्वने मला कामाला जाण्यास मनाई केली आहे. कोरोना रुग्ण आढळल्याने आमची बिल्डिंग देखील सील करण्यात आली आहे. मला माझा पूर्ण पगार घ्यायचा आहे. म्हणून मी अथर्वची समजूत काढून कामावरती येत आहे.
अथर्व अंकोलेकर हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने नुकतेच एकोणीस वर्षांखालील विश्वचषकामध्ये भारतीय संघाकडून खेळताना चांगली कामगिरी करत छाप सोडली होती.