टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठीच्या तयारींना सुरुवात झाली आहे. रांचीच्या जेएससीए क्रिकेट स्टेडियममध्ये १९ नोव्हेंबर रोजी होणारा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० सामना पाहण्यासाठी चाहत्यांना कोविड चाचणी प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.
स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी प्रेक्षकांना १५ नोव्हेंबरनंतरचे ‘आरटीपीसीआर’ किंवा ‘कोविड लसीचे दोन्ही डोस’ या अहवालांचा पुरावा दाखवावा लागणार आहे.
चाळीस हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या रांचीच्या जेएससीए क्रिकेट स्टेडियममध्ये झारखंड सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जास्तीत जास्त १८ हजार प्रेक्षकांना प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय सहाय यांनी सांगितले की, या सामन्याची तिकिटे १५ ते १७ नोव्हेंबरपर्यंत विकली जाऊ शकतात.
स्टेडियमच्या पश्चिम गेटजवळ उभारण्यात आलेल्या काउंटरवरून तिकीट विक्रीसाठी असोसिएशनने जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. तिकिटाचे दरही निश्चित करण्यात आले आहेत.
सर्वात कमी तिकिटाची किंमत ९०० रुपये आणि कमाल ९००० रुपये असेल. याशिवाय विविध श्रेणींसाठी बाराशे, चौदाशे, सतराशे, अठराशे, चार हजार, चार हजार पाचशे आणि पाच हजार पाचशे रुपयांची तिकिटे उपलब्ध असतील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तिकिटांची विक्री केली जाईल.
जेएससीए व्यवस्थापन समितीने प्रेक्षकांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. त्यानुसार मास्कशिवाय स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशाच्या वेळी एकमेकांपासून दोन फुटांचे अंतर अनिवार्य असेल. स्टेडियममध्ये कोणत्याही प्रकारची बॅग, कॅमेरा किंवा इतर वस्तू नेण्यास बंदी आहे. प्रेक्षकांना सांगण्यात आले आहे की, ते दिलेल्या आसन क्रमांकावरही बसतील, अन्यथा त्यांना सामना पाहण्यास नकार दिला जाऊ शकतो.
जवळपास दोन वर्षांनंतर या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी २०१९ मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात जेएससीए स्टेडियमवर कसोटी सामना खेळवला गेला होता. जवळपास चार वर्षांनंतर येथे टी-२० सामना होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ ऑक्टोबर २०१७ रोजी शेवटचा टी-२० सामना खेळवला गेला होता. या स्टेडियमवर सामन्याची इतर तयारी जोरात सुरू आहे. स्टेडियमची स्वच्छता आणि मैदानाची व्यवस्था सुधारण्यासाठी मोठ्या संख्येने मजूर कामाला लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकादरम्यान कर्णधार विराटने घेतलेले ‘हे’ ३ निर्णय भारतीय संघासाठी पडले महागात
‘चाहत्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी आम्ही दुप्पट मेहनत करू’, हार्दिक पंड्याने दिले आश्वासन