कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कॅरिबियन प्रीमियर लीग २०२० स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेतील १४ वा सामना बार्बाडोज ट्रायडेंट आणि जमैका तलावाह्ज संघात बुधवारी (२६ ऑगस्ट) पार पडला. या सामन्यादरम्यान तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. बार्बाडोज ट्रायडेंट संघाकडून फलंदाजी करताना काईल मेयर्सने ८५ धावांची ताबडतोब खेळी केली होती.
मेयर्सच्या या खेळीमुळे बार्बाडोज संघाने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १४८ धावा उभारल्या होत्या. या धावांचे आव्हान पार करण्यासाठी फलंदाजीला उतरलेला जमैका संघाला ९ बाद केवळ ११२ धावाच करता आल्या. त्यामुळे बार्बाडोज संघाने ३६ धावांनी विजय मिळविला.
काईल मेयर्सने सांभाळली संघाची जबाबदारी
प्रथम फलंदाजी करताना बार्बाडोज संघाची सुरुवात फार चांगली झाली नव्हती. त्यांनी केवळ २० धावांच्या आतच आपल्या २ विकेट्स गमावल्या होत्या. येथून पुढे मेयर्सने आपल्या संघाचा डाव सांभाळला. परंतु दुसऱ्या बाजूने त्याची साथ इतर फलंदाजांना देता आली नाही. असे असूनही मेयर्सने अधिकाधिक स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मोठमोठे फटकार लावत धावा केल्या त्याने केवळ ५९ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ८५ धावा कुटल्या होत्या.
त्याने केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीनेच ६० धावा केल्या, त्यातील ४८ धावा या त्याने षटकारांच्या मदतीने, तर उर्वरित १२ धावा या चौकारातून केल्या होत्या. मेयर्सव्यतिरिक्त बार्बाडोजच्या इतर कोणत्याही फलंदाजाला २० पेक्षा अधिक धावाही करता आल्या नाहीत. कर्णधार जेसन होल्डर तर केवळ १५ धावा करून बाद झाला होता. मेयर्ससह केवळ ३ खेळाडूंनाच २ आकडी धावसंख्या करता आली.
गोलंदाजांनीही सांभाळली जबाबदारी
बार्बाडोज संघाचा डाव फलंदाजीत मेयर्सने सांभाळला होता आणि एकट्याच्या जोरावर विरोधी संघासमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. यानंतर बार्बाडोजच्या गोलंदाजांनीही आपले काम चोखपणे पार पाडले. त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत जमैका संघाला निर्धारित षटकांमध्ये ११२ धावसंख्येवरच रोखले होते. बार्बाडोज संघाकडून मिचेल सँटनर, होल्डर आणि राशिद खान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर हेडन वॉल्शने १ विकेट आपल्या नावे केली.
जमैका संघाकडून खेळताना नकरुमाह बोनेरने सर्वाधिक ३१ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-पुरंदरचा धुरंधर घेणार सुरेश रैनाची जागा
-सुरेश रैनाच्या बाहेर जाण्याने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाला लागणार ब्रेक
-आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा पुणेकर क्रिकेटर कोरोना पाॅझिटिव्ह
ट्रेंडिंग लेख-
-एकाच ओव्हरमध्ये ३० धावा काढणारे आयपीएलमधील ५ सुपरस्टार, एकाने तर ३७ धावांचा केलाय कारनामा
-IPLमध्ये सामन्यात सीएसकडेकडून सर्वाधिक धावा करणारे ३ सुपरस्टार, तिसरे नाव आश्चर्यकारक
-१० कोटी रुपये मिळूनही आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लाॅप ठरलेले ३ भारतीय खेळाडू