इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) व बिग बॅश लीगनंतर जगातील तिसरी सर्वात मोठी व्यावसायिक टी२० स्पर्धा असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगचा (सीपीएल) अंतिम टप्पा जवळ येत आहे. सीपीएल २०२१ मधील सर्व साखळी सामने संपले असून, चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेतील या बाद फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक समोर आले असून, या स्पर्धेनंतर सर्व खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीकडे (युएई) आगेकूच करतील.
या संघांनी गाठली सीपीएलची उपांत्य फेरी
स्पर्धेचे स्वरूप अत्यंत मर्यादित असल्याने उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सर्व संघांनी जोरदार प्रयत्न केले. त्रिनबॅगो नाईट रायडर्स, गयाना अमेझॉन वॉरियर्स व सेंट किट्स नेविस पॅट्रीएट्स या संघाने प्रत्येकी दहा सामने खेळत ६ विजयासह १२ गुणांची कमाई केली. सेंट लुसिया किंग्सने ५ विजय मिळवत १० गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करणारा चौथा संघ होण्याचा मान मिळवला. जमैका थलावाज व बार्बाडोस रॉयल्स उपांत्य फेरीत जागा मिळवण्यात अपयशी ठरले.
असा रंगणार बाद फेरीचा थरार
ही संपूर्ण स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क मैदानावर विनाप्रेक्षक खेळले गेले. आता बाद फेरीचे सामने देखील याच मैदानावर होतील. १४ सप्टेंबर रोजी त्रिनबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध सेंट लुसिया किंग्स यांच्या दरम्यान पहिला उपांत्य सामना खेळला जाईल. त्यानंतर, १५ तारखेला सकाळी सेंट किट्स नेविस पॅट्रीएट्स विरुद्ध गयाना अमेझॉन वॉरियर्स यांच्यात दुसरा उपांत्य सामना होईल. स्पर्धेचा अंतिम सामना देखील १५ सप्टेंबर रोजीच सायंकाळी खेळला जाणार आहे.
त्रिनबॅगो नाईट रायडर्सला सर्वाधिक संधी
वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड नेतृत्व करत असलेल्या त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाला विजेतेपदाचा सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्रिनबॅगो नाईट रायडर्सने आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजे चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. तेच या स्पर्धेचे माजी विजेते आहेत.