जगातील नामांकित लीग पैकीच एक असलेली कॅरेबियन प्रीमियर लीग २०२२ ही ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वीच वेस्ट इंडिजचे अष्टपैलू कायरन पोलार्ड आणि आंद्रे रसेल एकाच संघात खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही लीग सुरू होण्यापूर्वी ६ संघानी रिटेन केलेल्या आणि विकत घेतलेल्या खेळाडूंची यादी घोषित केली आहे. या लीगची सुरुवात २०१३ मध्ये झाली असून आत्तापर्यंत या लीगचे ९ हंगाम खेळले गेले आहेत. त्रिनबागो नाईट रायडर्स (Trinbago Knight Riders) या संघाने तीन वेळा सीपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान आयपीएलमधील केकेआरबरोबरच त्रिनबागो संघाचा देखील मालक आहे. सीपीएलच्या १०व्या हंगामात संघाने कायरन पोलार्डला (Kieron Pollard) संघात रिटेन केले आहे. तसेच, आंद्रे रसेलला संघात घेतले आहे. आता हे दोन खेळाडू एकाच फ्रॅंचायझीसाठी खेळताना दिसणार आहेत.
त्रिमबागोने रसल शिवाय निकोलस पूरनला सुद्धा संघात समाविष्ट केले आहे. तसेच संघाने सुनील नारायण, अकील हुसैन, जायडन सील्स आणि टिऑन वेब्स्टर या खेळाडूंना रिटेन केले आहे. संघाने एकूण ७ खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. डिफेंडिंग चॅम्पियन संघ सेंट किट्सचा कर्णधार ड्वेन ब्रावोशिवाय एविन लुईस, शेल्डन काॅट्रेल, शेरफेन रुदरफोर्ड आणि डॉमिनिक ड्रेक्स यांना संघात रिटेन केले आहे. यांच्याशिवाय डॅरेन ब्रावो आणि आंद्रे फ्लेचरला संघात स्थान दिले आहे.
बार्बाडोस राॅयल्सने जेसन होल्डर, काइल मेयर्स, हेडन वॉल्श, ओशेन थॉमस आणि एन यंगला संघात रीटेन केले आहे. तसेच, ओबेड मॅक्काॅयला आणि डे्वाॅन थाॅमसला संघात विकत घेतले आहे. सेंट लूसिकाने रोस्टन चेस, के विलियमसन, अल्जारी जोसेफ आणि जे राॅयलला संघात रिटेन केले आहे. तसेच जॉनसन चार्ल्स आणि मार्क दयाल यांचा संघात समावेश केला आहे.
जमैकाने रोवमॅन पाॅवेल, केनार लुईस आणि शेमराम ब्रुक्सला संघात रिटेन केले आहे. फेबियन एलेन आणि ब्रेंडन यांचा संघात समावेश केला आहे. गयाना अमेझाॅन वाॅरियर्सने शिमराॅन हेटमायर, ओडियन स्मिथ, रोमारिया शेफर्ड, चंद्रपाल हेमराज या खेळाडूंना रिटेन केले आहे, तर कीमो पाॅल आणि जी मोटी यांचा संघात समावेश केला आहे.
कायरन पोलार्ड आणि आंद्रे रसल या दोघांचाही टी२० मधील विक्रम चांगला आहे. रसलने ४०१ टी२० सामन्यांत २६च्या सरासरीने ६६६९ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकांचा आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने ४०१ सामन्यात ३५६ विकेट्स घेतल्या आहेत. पोलार्डने ५८३ सामन्यात ११४५२ धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचा आणि ५६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ३०५ विकेट्स देखील घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई संघ एक जरी सामना हारला, तर होईल खेळ खल्लास; माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
राडाच ना! आवेश खानने केली बुमराह अन् शमीलाही न जमलेली कामगिरी; ‘या’ खास यादीत नोंदवले नाव






