वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना ८ ते १२ जुलै दरम्यान साऊथॅम्प्टन येथे खेळला जाईल. मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅन्चेस्टर येथे १६ ते २० जुलै दरम्यान खेळला जाईल. त्याचबरोबर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मॅन्चेस्टर येथेच २४ ते २८ जुलै दरम्यान खेळला जाईल.
जवळपास ४ महिन्यांनी क्रिकेट सामने होत आहे. त्यामुळे जगाचे लक्ष याकडे लागले आहे. अशा वेळी या पहिल्याच मालिकेत कोण नक्की चांगले काम करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोण आहेत ते ५ खेळाडू जे ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ बनू शकतात
१. बेन स्टोक्स (Ben Stokes)
इंग्लंडच्या संघाने २०१९ चा विश्वचषक जिंकला. या संघाला विश्वविजेते बनविण्यात संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याची मोलाची भूमिका होती. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅशेस मालिका बरोबरीत आणण्यातही बेन स्टोक्सने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
जर बेन स्टोक्सच्या आकडेवारीबद्दल बोलायचे तर इंग्लंडकडून ६३ कसोटीत त्याने ३६.५४ च्या सरासरीने ४०५६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत १४७ बळीही त्याच्या नावावर आहेत.
वनडेमध्ये त्याने ९५ सामन्यांत ४०.६४ च्या सरासरीने २६८२ धावा केल्या आहेत. तर त्याने ७० बळीही घेतले आहेत. २६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ३०५ धावा केल्या असून १४ बळी घेतले आहेत. या मालिकेत तो चांगली कामगिरी करून सामनावीर होऊ शकतो.
२. जेसन होल्डर (Jason Holder)
जेसन होल्डर वेस्ट इंडिजचा कर्णधार असून तो फलंदाजी, गोलंदाजी आणि उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण या करीत ओळखला जातो. त्याने फक्त इंग्लंडविरूद्ध फलंदाजी करताना दुहेरी शतक झळकावले आहे.
तसेच इंग्लंडविरूद्ध त्याने गोलंदाजीत सुद्धा उत्तम कामगिरी केली आहे. सध्या तो जगातील सर्वोत्तम कसोटी अष्टपैलू खेळाडू आहे. या कसोटी मालिकेदरम्यान, या दिग्गज खेळाडूला मालिकावीर पुरस्कार पटकविण्याची संधी आहे.
३. जोफ्रा आर्चर (Jofra Archer)
जोफ्रा आर्चर याला कोपऱ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो काही काळ क्रिकेट पासून दूर होता आणि आपल्या राष्ट्रीय संघामध्ये काही काळ खेळू शकला नाही. याच कारणामुळे तो दक्षिण आफ्रिका दौरा करू शकला नाही . आता तो या मालिके दरम्यान पुनरागमन करीत असून पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल.
जोफ्रा आर्चरचा जन्म वेस्ट इंडीजच्या बारबाडोसमध्ये झाला, परंतु तो बराच काळ इंग्लंडमध्ये राहत आहे. तो जगभरातील सर्वच टी-20 लीगमध्ये खेळला आहे.
तो आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो वेगवान गोलंदाजीच्या जोरावर या कसोटी मालिकेत मॅन ऑफ द सीरिज ठरु शकतो.
४. जेम्स एँडरसन (James Anderson)
जेम्स एँडरसन इंग्लंड संघातील एक प्रमुख गोलंदाज आहे. तो इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १५१ कसोटी सामन्यात २६.८ च्या सरासरीने ५८४ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर १९४ वनडे सामन्यात त्याने २६९ गडी बाद केले आहेत.
सध्या तो जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तो आपल्या शानदार स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. इंग्लंडच्या घराच्या मैदानावर कोणतीही कसोटी मालिका असली तरी जेम्स एँडरसन हा मालिकावीर पुरस्काराचा निश्चितच दावेदार असतो.
५. शाई होप (Shai Hope)
वेस्ट इंडिज संघातील शाई होप हा असा एक फलंदाज आहे, जो मागील बर्याच सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आला आहे. सध्याच्या घडीला तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो.
वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी काहीप्रमाणात त्याच्यावर अवलंबून असेल. वेस्ट इंडीजच्या शेवटच्या (२०१९) अफगाणिस्तान दौर्यामध्येही शाई होपच्या बॅटमधून धावा निघाल्या होत्या. काहीशा तशाच अपेक्षा या दौर्यातही संघाला त्याच्याकडून आहेत. या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान, शाई होप ‘मॅन ऑफ द सीरिज’चा सर्वात प्रबळ दावेदारही असेल.