७ जुलै २०२० रोजी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आपला ३९वा वाढदिवस साजरा केला. २००७ ते २०१६ या काळात या खेळाडूने भारतीय संघाच्या कर्णधारपदाचे शिवधनुष्य लिलया पेलले.
धोनीला भारताचे आजपर्यंतचे सर्वात यशस्वी कर्णधार समजले जाते. याच कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने अनेक संस्मरणीय विजय मिळवले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक यशस्वी कर्णधार झाले. पुढेही होतील. परंतू धोनी हे कायम एक वेगळेच रसायन राहिले आहे. त्याचा मैदानावरील वावर हा त्याची सतत अनुभूती द्यायचा.
तो कधीच चाहते सोडा विरोधकांनाही एक टिपीकल कर्णधार वाटला नाही. चला तर मग या लेखात आपण या कर्णधाराची काही गोष्टी जाणून घेऊया, ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा वाटतो.
१. धोनी कोणतीही जोखीम घेण्यास घाबरत नाही
एमएस धोनीच्या नेतृत्वात खास गोष्ट म्हणजे तो जोखीम घेण्यास कधीही घाबरत नाही. २००७ मधील टी-२० विश्वचषकात त्यांनी घेतलेल्या जोखमीमुळेच भारत टी-२० विश्वचषक जिंकण्यात यशस्वी झाला.
त्यावेळी धोनीने जोखीम पत्करुन अनुभवी हरभजन सिंग ऐवजी युवा गोलंदाज जोगिंदर शर्माला गोलंदाजी दिली होती. पुढे त्याच जोगिंदरने शानदार गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या धोकादायक निर्णयांमुळे भारतीय संघाला बर्याच वेळा यश मिळाले आहे. अन्य संघातील कर्णधार अशी जोखीम घेण्यास घाबरतात.
२. टीकाकारांना टीका करू न देता स्वतःच अधिराज्य गाजवले
धोनीची खास गोष्ट अशी होती की तो टीकाकारांना अधिराज्य गाजवू देत नाही. त्याच्या कर्णधारपदावरही बर्याचदा टीका झाली आहे, परंतु कर्णधारपदाबाबत तो नेहमीच सकारात्मक राहिला आणि त्यांनी त्याने पुढाकार घेत संघाला यश मिळवून दिले आहे.
इतर कर्णधारांनी त्यांच्यावर झालेल्या टीकांमुळे कर्णधारपद सोडले, परंतु धोनीवर बर्याचदा टीका झाली होती, परंतु त्याने कर्णधारपद न सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने जेव्हा स्वतः ठरवलं तेव्हा कर्णधार पद सोडलं.
३. कर्णधार म्हणून डोकं नेहमीच शांत ठेवणारा व्यक्ती
जगातील अनेक कर्णधार आपल्या खेळाडूंनी केलेल्या चुकीच्या क्षेत्ररक्षणाबद्दल मैदानावर किंवा मैदानाबाहेर चिडताना दिसले आहेत, परंतु एमएस धोनी असा कर्णधार होता जो मैदानावर नेहमीच शांत राहायचा. क्षेत्ररक्षकांवर त्यांचा राग कधी दिसला नाही. एका कठीण परिस्थितीत तो अगदी शांत असायचा आणि निर्णय घ्यायचा, म्हणून त्याचे नाव ‘कॅप्टन कूल’ असेही ठेवले गेले.
४. आयसीसीचे तिन्हीही चषक जिंकणारा एकमेव कर्णधार
एमएस धोनीने आयसीसीचे तीनही मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ चा टी-२० विश्वचषक जिंकला. त्याचबरोबर त्याने २०११ मधील एकदिवसीय विश्वचषक जिंकला. धोनीच्या नेतृत्वात भारताने २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली.
एमएस धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीचे तिन्हीही मोठे चषक जिंकले आहेत. हा एक मोठा फरक त्याच्यात व इतरांत कायम राहिला आहे.
५. समयसूचकता (Presence of Mind)
एमएस धोनीची समयसूचकता (प्रजेंस ऑफ़ माइंड) आश्चर्यकारक आहे. अशी प्रजेंस ऑफ़ माइंड जगाच्या इतर कर्णधारांमध्ये फारच कमी दिसून आला आहे. बऱ्याच वेळा तो विकेटच्या मागे प्रजेंस ऑफ़ माइंड वापरताना दिसला.
त्याने बर्याचदा फलंदाजांना स्टंप न बघता धावचीत केलं आहे. कितीतरी वेळा फलंदाजही त्याच्या करामती पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. तो इतर कर्णधारांपेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असायचा.