भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शनिवारी (१९ डिसेंबर) संपन्न झाला. या सामन्यात भारताचा दारुण पराभवाचा सामना करावा लागला. अशाप्रकारे, चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला यशस्वीरित्या सुरुवात झाली. मात्र, याच मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या आयोजनस्थळावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या विषयावरील प्रश्नांना उत्तरे देत म्हटले की, सामना ठरल्याप्रमाणे नियोजित ठिकाणीच खेळवला जाईल.
सिडनीत वाढतोय कोरोनाचा प्रभाव
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनीतील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळणे नियोजित आहे. मात्र, सिडनीत मागील काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे, हा सामना इतरत्र हलवण्याबाबत विचार केला जात होता. सिडनीतील परिस्थिती गंभीर झाल्यास हा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉक्ले यांनी याबाबत माहिती दिली आहे.
सामना सिडनीतच होईल
ऑस्ट्रेलियातील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या सिडनी हेरॉल्ड मॉर्निंगला दिलेल्या मुलाखतीत हॉक्ले म्हणाले, “तिसरी कसोटी सुरू होण्यास आणखी अडीच आठवड्यांचा कालावधी आहे. त्यामुळे आम्हाला सिडनीतील नॉर्दन बीचेसमधील आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेण्यास पुरेसा अवधी मिळेल. अजून तरी पूर्वनियोजित कार्यक्रमात कोणताही बदल झाला नाही. तिसरा सामना सिडनीमध्ये खेळण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. आम्ही या संकटकाळात चांगले काम केले आहे. यापुढेही सरकार, राज्य सरकार तसेच क्रिकेट संघटनाज्ञ मिळून आम्ही आणखी चांगले काम करू.”
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील हा तिसरा सामना सिडनीतील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळणे निश्चित झाले आहे. हा सामना ७ ते ११ डिसेंबर या दरम्यान होईल. त्यानंतरच या मालिकेतील अखेरच्या सामन्यात दोन्ही संघ ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर भिडतील.
ब्रेट ली परतला आहे सिडनीला
सिडनीत कोरोनाचा वाढत असलेला प्रभाव पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि फॉक्स क्रिकेटचा समालोचक ब्रेट लीने सिडनीतील आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासह प्रसारण विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी देखील घरी परतले होते.
महत्वाच्या बातम्या:
– बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड; या धाकड फलंदाजाचे मेलबर्नमध्ये आगमन
– द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा; माजी कर्णधाराचा बीसीसीआयला सल्ला
– टीम इंडियाला रोहित शर्माची नितांत गरज, लवकरात लवकर संघात सहभागी करावे






