मे महिन्यात कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामातील (आयपीएल) उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईत आयोजित करण्याचे ठरवण्यात आले आहे. यात आता आयपीएल चाहत्यांसाठी एक खुशखबर आली आहे. आयपीएलच्या उर्वरित दुसऱ्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खेळणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.
एका रिपोर्टनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित आयपीएल २०२१ खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना परवानगी दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ म्हणजेच एनओसी दिला आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्थगिती दिल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
या आधीच भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंडचे खेळाडू उर्वरित आयपीएल सामने खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील मालिका स्थगित झाल्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएल खेळण्यासाठी मार्ग मोकळा झाला. आयपीएलच्या १४ व्या हंगामानंतर लगेचच यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचे देखील आयोजन होणार आहे. त्यामुळे विश्वचषकाची तयारी म्हणून अनेक विदेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतात.
एप्रिलमध्ये सुरु झालेल्या आयपीएलच्या १४ व्या हंगामात कोरोनाचा शिरकाव झाला होता. यामुळे या हंगामाला मे महिन्याच्या सुरुवातीलाच २९ सामन्यानंतर स्थगिती देण्यात आली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्यांसाठी तात्पुरती बंदी घातली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ इत्यादी ४० सदस्यांना मालदीवला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआयने खाजगी विमानाने सर्व ऑस्ट्रेलिया सदस्यांना मायदेशात पाठवले होते.
दरम्यान, उर्वरित हंगामातील ३१ सामने यूएईमध्ये होणार असून १९ सप्टेंबरला पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.
आयपीएल २०२१ हंगामात आत्तापर्यंत झालेल्या २९ सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स ८ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. प्रत्येकी ७ पैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. तर ७ पैकी ४ सामने जिंकून मुंबई इंडियन्स संघ चौथ्या स्थानावर आहे.
आयपीएल नंतर लगेचच ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धेचे देखील आयोजन होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–Video: भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला उन्मुक्त चंद अमेरिकेतही पदार्पणातच फ्लॉप; ‘असा’ झाला शुन्यावर बाद
–खास वेलकम! क्रिकेटच्या भाषेत पायलटने केले मुंबई इंडियन्सचे शानदार स्वागत, व्हिडिओ जिंकेल तुमचेही मन
–…म्हणून भारताविरुद्ध रूटच्या बॅटमधून होतेय धावांची वर्षा, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले रहस्य