दिल्ली। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने याआधीच इंग्लंड काऊंटी क्रिकेट खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारताचा जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा आहे. याच दृष्टिकोनातून त्याने काऊंटी क्रिकेट हे या दौऱ्यासाठी फायद्याचे ठरेल, असे म्हटले होते.
त्यातच जूनमध्ये अफगानिस्तान विरूध्द एकमेव कसोटी सामना आहे. कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळालेला अफगानिस्तान त्यांचा पहिलाच कसोटी सामना भारताविरूध्द खेळणार आहे.
मात्र या प्रकरणावरून बीसीसीआय आणि विनोद राय यांच्या अंतर्गत असलेली सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती (सीओए) यांच्यात वाद निर्माण झाले आहेत.
बीसीसीआयच्या मते, कोहलीने हा एकमेव कसोटी सामना खेळावा तर सीओए त्याच्या विरोधात आहे. त्यांच्या मते, कोहलीचे काऊंटी क्रिकेट खेळणे हे इंग्लंडचा दौऱ्यासाठी फायद्याचे आहे.
“आंतरराष्ट्रीय सामना डालवून कोहलीचा काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय हा चुकीचा आहे. त्याला या सामन्याचे महत्व कमी वाटत असेल. कदाचित हा निर्णय अफगानिस्तान संघाबाबत चुकीचा संदेश फिरवू शकतो”, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
“जर त्यावेळेस तो इंग्लंडमध्ये खेळत असेल तर त्याने या कसोटी सामन्यासाठी भारतात येऊन परत जावे. खरच जर तो काऊंटी क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे तर त्याने आयपीएलचे सामने वगळण्यास परवानगी मागितली आहे का ?”
चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा हे आयपीएल खेळत नसल्याने ते काऊंटी क्रिकेट खेळत आहेत. विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय हे इंग्लंड दौऱ्याआधीच तेथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी लवकर जाणार आहेत.