कोरोना विषाणू महामारीमुळे मागील ४ महिन्यांपासून क्रिकेटचे सर्व कार्यक्रम थांबले आहेत. सर्व ठिकाणी क्रिकेट बंद होते. पण आता क्रिकेटच्या मैदानत खेळाडू खेळताना दिसणार आहेत. वेस्ट इंडीज संघ इंग्लंड दौऱ्यावर आला आहे.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाला इंग्लंडमध्ये गेल्या २ आठवड्यांपासून क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. या संघाने सराव सामना देखील खेळला आहे.
८ जुलै रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज संघ यांच्यात प्रेक्षकांशिवाय सामना खेळवला जाणार आहे. सर्व चाहते या सामन्याबद्दल खूप उत्सुक आहेत. हा सामना एजिस बाऊल, साऊथॅम्प्टन येथे खेळला जाईल. आता बऱ्याच दिवसानंतर जेव्हा खेळाडू मैदानावर उतरतील तेव्हा प्रेक्षकांच्या नजरा काही खेळाडूंवर टिकून राहतील. या लेखात पाहूया कोण आहेत ते ५ खेळाडू ज्यांच्यावर प्रेक्षकांची नजर असेल.
१. जोस बटलर (Jos Buttler)
या यादीतील पहिले नाव आहे, इंग्लंड क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलर याचे. पहिल्या कसोटी सामन्यात बटलर याच्यावर सर्वांचं लक्ष असेल. कारण निवड समितीने त्याला जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) याच्या जागी संघात संधी दिली आहे. याचमुळे बटलरच्या खांद्यावर चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी असेल.
२९ वर्षीय जोस बटलरने आतापर्यंत इंग्लंडकडून खेळलेल्या एकूण ४१ कसोटी सामान्यत ३१.७४ च्या सरासरीने २१२७ धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने १ शतक आणि १५ अर्धशतकेही ठोकली आहेत. यष्टीरक्षक म्हणून विकेटच्या मागे ८८ बळी आहेत.
२. जेसन होल्डर (Jason Holder)
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा कर्णधार आणि दिग्गज खेळाडू जेसन होल्डर या खेळाडूवर देखील सर्वांची नजर असेल. तो सध्या जगातील नंबर एकचा कसोटी अष्टपैलू खेळाडू आहे. जेसन होल्डर कॅरेबियन संघातील काही खेळाडूंपैकी एक दिग्गज खेळाडू आहे.
संपूर्ण वेस्ट इंडीज संघ बहुधा त्याच्यावर अवलंबून असतो असेही म्हटले जाऊ शकते. होल्डरने विंडीजसाठी आतापर्यंत फक्त ४० कसोटी सामने खेळले आहेत, यात त्याने फलंदाजीमध्ये ३२.७२ च्या सरासरीने १८९८ धावा केल्या आहेत. तर २६.३७ उत्तम सरासरीने १०६ बळी मिळवले आहेत.
जेसन होल्डरने कसोटी सामन्यांच्या ६९ डावात ३ शतके आणि ८ अर्धशतके झळकावली आहेत, तर त्याची सर्वोत्तम कामगिरी २०२ आहे. हे द्विशतक त्याने इंग्लंडविरुद्ध झळकावले होते. गोलंदाज म्हणून त्याने एका डावात ५ विकेट्स ६ वेळा घेतल्या आहेत आणि एकदा त्याने एका सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.
३. बेन स्टोक्स (Ben Stokes)
इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यावर देखील सर्वांची नजर असेल. खरं तर, इंग्लंडचा नियमित कर्णधार जो रूट (Joe Root) काही वैयक्तिक कारणास्तव पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नाही, त्यामुळे उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या स्टोक्सला कर्णधारपद देण्यात आले आहे.
आता सर्वांच्या नजरा त्याच्याकडे असतील, कारण तो पहिल्यांदा कर्णधार म्हणून मैदानावर उतरणार आहे. इंग्लिश क्रिकेट इतिहासातील स्टोक्स हा ८१ वा कर्णधार असेल. मर्यादित षटकांचे क्रिकेट असो किंवा कसोटी सामने, या दोन्ही प्रकारात स्टोक्सने गेल्या काही वर्षांत चांगलीच कामगिरी बजावली आहे.
विश्वचषक २०१९ जिंकल्यानंतर स्टोक्सने ऑस्ट्रेलियाबरोबर खेळलेली अॅशेस मालिका २-२ अशी बरोबरी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्टोक्सकडून चाहत्यांना त्याच्या चांगल्या खेळाची तसेच चांगल्या कर्णधारपदाची अपेक्षा असेल.
४. शाई होप (Shai Hope)
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज शाई होप देखील या यादीत आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट संघाच्या शाई होप कडून या दौर्यावर मोठ्या अपेक्षा असतील. कारण २०१७ मध्ये जेव्हा विंडीज संघ इंग्लंडला गेला तेव्हा होपने उत्कृष्ट खेळ दाखविला.
लीड्स येथे सलग २ डावांमध्ये २ शतक ठोकून होपने संघाच्या धावा वाढवण्यास मदत केली. परंतु , तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. पण या वेळी तो संघाला जिंकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसू शकतो.
शाई होपने आतापर्यंत एकूण ३१ कसोटी सामने खेळले असून त्यात २७.२३ च्या सरासरीने आणि २ शतकांसह १४९८ धावा केल्या आहेत. आता होपच्या फलंदाजीने किती धावा निघतील हे पाहण्यास सर्वजण तयार आहेत.
५. जोफ्रा आर्चर (Jofra Archer)
आगामी कसोटी मालिकेत इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांचेही नाव समाविष्ट आहे. आर्चर दुखापतीनंतर मैदानावर पुनरागमन करताना दिसेल. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
खरं तर, २९ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार होती. दुखापतीमुळे तो आयपीएलमध्ये सहभागी होणार नाही. राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांना आर्चरच्या दुखापतीमुळे निराश केलं होतं.
पण कोरोना विषाणूमुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आणि आर्चर आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
बर्याच वेळा असे दिसून येते की वेगवान गोलंदाज दुखापतीनंतर परतण्यासाठी थोडा वेळ घेतोच. आता सर्व क्रिकेट चाहत्यांचे डोळे आर्चरवर असतील. त्याला चांगली लय मिळाली तर वेस्ट इंडिजचे मात्र काही खरे नाही.